

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गतवर्षीच्या राज्याच्या वार्षिक सेवा व वस्तू करात (जीएसटी) पेक्षा यंदा राज्याच्या जीएसटी संकलनात २.३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थखात्याकडून जारी झालेल्या आकडेवारीनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान राज्यात ४,८०५ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
तर यंदा २०२५-२६ मध्ये एप्रिल ते डिसेंबर दरम्यान हे संकलन ४.९१८ कोटी रुपये झाले आहे. यंदाच्या जीएसटी संकलनात ११३ कोर्टीची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात पर्यटन व अन्य व्यवसाय वाढले आहेत.
यामुळे जीएसटी संकलनातही वाढ होत आहे, असे असले तरी केंद्र सरकारने जीएसटी कपात केल्यानंतर यंदा राज्याच्या एकूण संकलनात काहीशी घट झाली आहे. जाहीर आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सर्वाधिक ८०६ कोटी रुपये मासिक जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात झाले.
चालू आर्थिक वर्षात राज्यात डिसेंबर २०२५ मध्ये सर्वात कमीम्हणजेच ३६५ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले, तर नोव्हेंबरमध्ये ३९७ कोटी, सप्टेंबरमध्ये ५३५ कोटी, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी ५४५ कोटी, जूनमध्ये ५५१ कोटी, जुलैमध्ये ५८६ कोटी तर मे महिन्य ५८७ कोटी रुपये जीएसटी संकल झाले होते.
मुख्यमंत्री नाखुश; पण आशावादी
डिसेंबर महिन्यात जमा झालेल्या जीएसटी संकलनाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाखुशी व्यक्त केली आहे. शुक्रवारी पत्रकाराशी बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, ज्या वेगाने जीएसटीचे संकलन गेले काही महिने सुरू होते; त्या वेगाने डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन झालेले नाही. मात्र, येत्या महिन्यात ती वाढू शकते, अशी प्रतिक्रिया डॉ. सावंत यांनी दिली.