पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार घरोघरी सुरू आहे. टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी विरुध्द आम्ही पणजीकर या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. दोन्ही पॅनलचे उमेदवार आपापल्या नेत्यांसह पणजीतील घरोघरी प्रचार करत आहे.
या प्रचारात आम्ही पणजीकर पॅनलने श्री महालक्ष्मी मंदिराजवळील बॉक द वॉक झरीचा विषय प्रचाराचा विषय बनला आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना या झारीचा करोडो रुपये खर्च करुन विकास करण्यात आला होता.
भुयारी भागात सुशोभिकरण करुन चित्रे लावली होती. गोमुख सुशोभित केले होते. मात्र, आता या झराची वाताहात झाली आहे. पूर्वी येथे पर्यटक येत होते तेही बंद झाले. आहेत. पणजीचा ५०० कोटी खर्च करुन विकास करणाऱ्यांनी बोक द वॉक येथील झरीकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न या भागातील उमेदवार उपस्थित करत आहेत.
पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात हे प्रोग्रेसिव्ह पॅनलच्या उमेदवाराचा प्रचार करत असून उत्पल पर्रीकर हे आम्ही पणजीकर पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.
घराणेशाही मान्य झाली नसती...
पणजीचा आमदार मंत्री, ताळगावात त्यांची पत्नी आमदार, पुत्र महापौर अशी सध्या स्थिती आहे. एका घरात तीन मोठी पदे देऊन पणजीत घराणेशाही चालवली जात आहे. मनोहर पर्रीकर आज हयात असते, तर त्यांना ही घराणेशाही कधीच मान्य झाली नसती, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.