

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मांडवी नदीत असलेल्या तरंगत्या कॅसिनोंमध्ये आणखी एका मोठ्या कॅसिनोची भर पडणार आहे. त्याला परवानगी देण्याच्या हाचचाली सुरू झाल्या आहे. मांडवीमधील प्रदूषण व शहरातील स्थानिकांना सहन कराव्या समस्या यामुळे नव्या कॅसिनोला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन महापौर रोहित मोन्सेरात यांना स्थानिकांनी दिले.
नव्या कॅसिनोला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करत पणजी महापालिकेने त्यासंदर्भातचा ठराव घ्यावा असे महापौरांना विनंती केली. सध्या मांडवीत नवीन कॅसिनो येत आहे तो सुमारे ११२ मीटर लांब व २७ मीटर उंच आहे.
त्यामुळे आता जुन्या कॅसिनोंच्या जागी असे मोठे कॅसिनो जहाज आणून मांडवी नदी व्यापली जात आहे. महापौरांना निवेदन दिले त्यामध्ये जॅक सुखीजा, पेट्रीसिया पिंटो, वाल्मिकी नाईक व स्थानिकांचा समावेश होता. गेल्या अनेक वर्षापासून पणजीतील लोकांना या कॅसिनोंमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
रात्रीच्यावेळी पर्यटक वाहने कोठेही पार्क करत असल्याने त्यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. आधीच असलेल्या तरंगत्या कॅसिनो जहाजामुळे मांडवी नदी प्रदूषित झाली आहे. त्यातच या नव्या मोठ्या कॅसिनो जहाजाची भर पडणार असल्याने ही समस्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्याला परवानगी दिली जाऊ नये, असे वाल्मिकी नाईक यांनी महापौरांना विनंती केली.