

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून परदेशी नागरिकत्व स्वीकारण्याचा कल कायम असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. २०१४ पासून आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक जणांनी भारतीय पासपोर्ट जमा केले आहेत. यातील अनेकांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले आहे.
परदेशी नागरिकत्व घेतल्यानंतर भारतीय पासपोर्ट समर्पित करणे आवश्यक असते.
राज्य सरकारच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०१४ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत २५,९३९ जणांनी भारतीय पासपोर्ट जमा केला. त्यानंतर ३० जून २०२६ पर्यंत आणखी ६,१६० जणांनी पासपोर्ट जमा केल्याची नोंद आहे.
त्यानुसार ही संख्या ३२,८९९ वर पोहोचते. राज्यात पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. पोर्तुगीज नागरिकत्वामुळे युरोपमध्ये राहण्याच्या आणि काम करण्याच्या संधी उपलब्ध होत असल्याने काही गोमंतकीय हा पर्याय स्वीकारतात. विशेषतः २०१५ आणि २०१६ मध्ये दरवर्षी चार हजार जणांनी पासपोर्ट जमा केला आहे.
२०२० मध्ये कोरोना महामारीचा परिणाम पासपोर्ट समर्पणाच्या संख्येवर दिसून आला. त्या वर्षी ९७६, तर २०२१ मध्ये ९५४ जणांनी भारतीय पासपोर्ट जमा केला. २०२२ मध्ये ही संख्या वाढून १,२८५ झाली. त्यानंतर पुन्हा वाढ झाली. २०२३ मध्ये २,०९४, २०२४ मध्ये २,२९५ आणि २०२५ मध्ये १,७९७ जणांनी पासपोर्ट जमा केल्याचे आकडेवारीत नमूद आहे. २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत ७७४ जणांनी पासपोर्ट जमा केला आहे.
मागील दशकाच्या मध्यकाळात पासपोर्ट जमा करण्याचे प्रमाण तुलनेने अधिक होते. २०१४ मध्ये २,०३७, २०१५ मध्ये ३,९४०, २०१६ मध्ये ४,१२१ आणि २०१७ मध्ये ३,६२३ जणांनी भारतीय पासपोर्ट जमा केला. २०१८ मध्ये ही संख्या ३,५१६, तर २०१९ मध्ये २,९५८ होती.