

पणजी : पुढारी वृत्तसेवा
ओंकार हत्ती आणि त्याच्या आईची, म्हणजे ५ हत्तींच्या कळपातील मोठ्या मादीची भेट आता तरी होणार का, याची उत्सुकता गोव्याच्या सीमेवरून पुन्हा तिळारी खोऱ्याकडे परतलेल्या ओंकारच्या एकूण फिरस्तीकडे पाहून गोव्यासह सिंधुदुर्गातील अनेकांना लागून आहे.
गोव्यातून दोडामार्ग तालुक्यात परतलेला ओंकार हत्ती मंगळवार, दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी सासोली येथून गोव्यातील हणखणे सीमेवर पोचला होता. मात्र, तो गोव्यात प्रवेश न करता कुडासे, परमे येथून घोटगेत पोचला आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा वावर त्याच परिसरात होता.
गोवा सीमेवरून कुडासेत पोचलेला ओंकार रात्री ९.११ वा. परमेच्या दिशेने गेला, तर आज, सकाळी ६.३३ वा. तो घोटगे येथील संतोष दळवी यांच्या बागेच्या दिशेने गेला. या बागेत काही दिवसांपूर्वी अन्य हत्तींचा कळप येऊन बागायतीत नुकसान करून गेला होता.
याच दरम्यान, ७.१९ वा. गणेश, ओंकारची आई, छोटी मादी व २ पिल्ले घाटीवडे बांबर्डे येथील वनक्षेत्रात होती. त्यानंतर ओंकारचा वावर दुपारी १२.५२ वा. घोटगे येथील सोनू दळवी यांच्या काजू बागेत, तर सायंकाळी ७.५६ वा. घोटगे येथील सुरेश दळवी यांच्या काजू बागेत तिळारी कालव्या शेजारी होता. वनकर्मचारी, हाकारे यांनी ओंकारला शिरवलपर्यंत नेले होते. त्यानंतर तो घोटगेवाडीत गेला होता.
नंतर पुढे घाटीवडे बांबर्डेत दुसऱ्या कळपातील आई व अन्य सदस्यांकडे जाण्याऐवजी पुन्हा गोव्याकडे परतला होता.
ओंकार आणि आईमध्ये १८ कि. मी.चे अंतर
ओंकार आणि ५ जणांच्या कळपात असलेली मोठी मादी म्हणजे ओंकारची आई यांच्यामध्ये रात्री १८ किलोमीटरचे अंतर होते. आता ओंकार आणि आईची पुनर्भेट होते, की ओंकार पुन्हा मार्ग बदलून दुसरीकडे जातो याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.