

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
ओंकार ये... ओंकार ये... अशी साद घातल मोप भागातील काही नागरिक व शेतकरी ओंकारासोबत मैत्री करतानाचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे ओंकारने कडशी मोप नदी डुबकी थंडगार पाण्यात पोहताना दिसून आला.
मागच्या तीन दिवसांपासून ओंकार हत्तीने कडशी मोप या भागात आपले बस्तान मांडले असून काजू बागायतीतील काजू, कवाथे याची नासधूस करायलाही सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी नागरिक ओंकार हत्तीच्या प्रेमात पडत असून, ओंकार ये ओंकार ये असे हाका मारत असल्याचेही चित्र दिसून आले.
ओंकार हत्तीचा वनखात्याने त्वरित बंदोबस्त करून त्याची रवानगी पुन्हा कर्नाटक भागात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागच्या अनेक दिवसांपूर्वी ओंकार हत्तीने पेडणे तालुक्यातील मोप कडशी तोरसे उगवे तांबोसे भागात येऊन धुमाकूळ घातला होता.
त्यावेळीही वन खात्याला या हत्तीचा बंदोबस्त करता आला नव्हता. आता या हत्तीला हाकलून देण्याचा प्रयत्न वन खात्याचे कर्मचारी नागरिक करत आहेत.
तर महाराष्ट्राच्या सीमेवर तेथील वनखात्याचे कर्मचारी शेतकरी नागरिक ओंकार हत्तीला आमच्या हद्दीत आणू नका, यासाठी दमदाटी करत असल्याचेही चित्र दिसून आले.