

पणजी : पुढारी वृत्तसेवा
जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त बुधवारी, ३ डिसेंबर रोजी होत आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून यात्रेकरू मोठ्या संख्येने जुने गोवे येथे पोहोचत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोव्याच्या उत्तर व दक्षिण भागातून अनेक भाविक दरवर्षीप्रमाणे यंदाही फेस्तासाठी हजेरी लावत आहेत. अनेकजण पदयात्रेने बेसिलिका चर्चमध्ये दर्शनासाठी येतात.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रांग व्यवस्थापनासाठी मोठ्या मंडपाची सोय करण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक यात्रेकरूला नीट दर्शन स्थळापर्यंत पोहोचता येईल. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची तात्पुरती सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रार्थनेसाठी चर्चसमोर स्वतंत्र प्रार्थनगृह उभारण्यात आले असून तिथे दररोज प्रार्थना सुरू आहेत. दरम्यान, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फेस्ताच्या सुरक्षेचा तसेच सर्व तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीत उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, वाहतूक पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर, अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालक, तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी, जुने गोवे पंचायतीचे प्रतिनिधी, चर्च प्रशासनाचे प्रतिनिधी आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.