

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विशिष्ट हंगामात मिळणाऱ्या कंदमुळांपासून बनवलेली म्हाना (माना/कापा) यांची फेस्तात मोठी मागणी असून या पदार्थाला अक्षरशः भाव मिळत आहे. ख्रिस्ती बांधवांकडून या मानांना विशेष पसंती असल्याने गोव्यातील बहुतेक सर्व फेस्तात ही म्हाना विक्रीसाठी ठेवली जाते. अनेक गोमंतकी खाद्यपदार्थात वापरला जाणारा हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट असल्यामुळे याला मोठी लोकप्रियता आहे.
जुन्या दुकानांमध्ये म्हानांची विक्री जोरात सुरू असून कंदमुळांची पातळ कापे करुन ती वाळवून विक्रीसाठी तयार केली जातात. वाळवण्याच्या प्रक्रियेनंतर त्यावर नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करून त्या खाण्यायोग्य बनवल्या जातात. कापांच्या आकारानुसार छोट्या पॅकेटमध्ये ८ ते १० कापा ठेवून त्यांची विक्री होते. एका पॅकेटची किंमत १५० रुपये आहे.
फेस्तात मिठाईचे दुकान लावलेल्या दिवाडकर बंधूंकडेही म्हाना विक्रीसाठी होत्या. त्यांनी सांगितले की, या म्हाना सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथून आणल्या जातात. काटे, कणगी, कंदारे यांचा जसा हंगाम असतो, त्याच काळात म्हणजे नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये म्हानांचा हंगाम असतो.
गोव्यातील फेस्तात विकण्यासाठी दुकानदार दोडामार्गमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात या म्हाना विकत आणतात. फेस्ताची सीजन संपल्यानंतर उरलेला माल म्हापसा बाजारात विकला जातो, अशी माहिती दिवाडकर बंधूंनी दिली.