

पणजी : साळखी मतदारसंघातील बेळगे येथे बांधण्यात आलेल्या उत्तर गोवा आयुष इस्पितळ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच या इस्पितळाचे उद्घाटन होणार आहे. आयुष मंत्रालयाच्या गोवा विभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५० खाटांची सोय या इस्पितळात असेल. तसेच अशाच प्रकारचे ५० खाटांचे आयुष इस्पितळ मोतीडोंगर, मडगाव येथेही उभारण्यात येत असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
धारगळ येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या आयुष इस्पितळ सुरू झाल्यानंतर तेथे दररोज ५०० रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतात. या मुख्य इस्पितळाला संलग्न अशी उत्तर व दक्षिण गोवा आयुष इस्पितळे सुरू होणार असल्याचे अधिकारी म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेळगे येथील आयुष इस्पितळाची पाहणी केली होती. त्यावेळी मार्च २०२६ मध्ये हे इस्पितळ खुले होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
इथे हे मिळणार उपचार...
उत्तर व दक्षिण गोवा आयुष इस्पितळात शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा असेल तसेच आयुष, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, योगासने आदींची ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) असतील. तेथे रुग्ण भेट देऊन उपचार करून घेऊ शकतील. पंचकर्मा, वीरेचन, नास्य, अभ्यंग, योगासने, ध्यानधारणा याद्वारे उपचारांची सोय असणार आहे.
गोवा वैद्यकीय पर्यटन केंद्र करण्याचे ध्येय
गोवा राज्य वैद्यकीय उपचार पर्यटन केंद्र बनवण्याचे ध्येय गोवा सरकारने ठेवले आहे, त्यानुसार आयुर्वेद व योग याद्वारे उपचार करण्यासाठी विविध इस्पितळांत विभाग स्थापन करण्यात आले आहेत. उत्तर व दक्षिण गोवा आयुष इस्पितळे सुरू झाल्यानंतर गोव्यात येणाऱ्या पर्यटकाना आयुर्वेदीक उपचार जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत.
राज्यात २० वेलनेस सेंटर्स
श्रीपाद नाईक हे केंद्रीय आयुष मंत्री असताना गोव्यात धारगळ येथे मुख्य व वेळगे आणि मोतीडोंगर येथे प्रत्येकी एक अशी दोन जिल्हा आयुष इस्पितळे उभारण्यास सुरुवात केली होती. त्याच बरोबर राज्यात २० वेलनेस सेंटर स्थापन करण्याचे ठरले होते. त्यानुसार राज्यातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही केंद्रे स्थापन केली गेली आहेत.