

पणजी : पुढारी वृत्तसेवा
म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्यासंदर्भातील कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी लोकसभेतील लेखी उत्तरातून स्पष्ट केले. खासदार विरिएतो फर्नांडिस यांनी म्हादईचे पाणी वळविण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका आणि त्याच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
फर्नांडिस यांनी म्हादईचे पाणी वळविल्यास जंगल, जैवविविधता, भूजल, खाडीतील पाण्याची क्षारता तसेच गोव्यातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत सरकारकडे माहिती मागितली होती. तसेच कर्नाटकातील खानापूर व बेळगाव भागातील जंगलतोड आणि परिसंस्थेच्या ऱ्हासाच्या धोक्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर कीर्ती वर्धन सिंग यांनी सांगितले की, नदी वळविण्याच्या प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ मूल्यांकन समितीकडून प्रकल्पाच्या पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांचा सविस्तर अभ्यास केला जातो, असेही ते म्हणाले.
सविस्तर अभ्यासानंतर पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि अटी निश्चित करूनच प्रकल्पाला मंजुरी दिली जाते. म्हादई नदीचे पाणी वळविण्याबाबत आतापर्यंत केंद्र सरकारकडे कोणताही प्रस्ताव सादर झालेला नाही. तसेच अशा प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी देण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव सध्या मंत्रालयाच्या विचाराधीन नसल्याचेही सिंग यांनी स्पष्ट केले.