

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, माय भारत अंतर्गत रविवारी २५ रोजी पणजीत माय भारत माय व्होट या घोषवाक्यासह राष्ट्रीय मतदार दिन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुण आणि नवीन मतदारांमध्ये मतदानाचा हक्क आणि अधिकाराबाबत जागृती करण्यासाठी या उपक्रमाचे भारत सरकारतर्फे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र-गोवा राज्य संचालक कालिदास घाटवळ यांनी दिली.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवणे हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
हा कार्यक्रम एक देशव्यापी युवा संघटन उपक्रम असून, विशेषतः पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक म्हणजे युवकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे,
मतदार नोंदणी आणि निवडणूक तपशिलांमधील दुरुस्तीसाठी प्रोत्साहित करणे आणि लोकशाही मूल्यांना बळकटी देणे. ही पदयात्रा २५ जानेवारीला मिरामार युथ हॉस्टेलपासून ते कला अकादमीपर्यंत सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार विजेते युवक उपस्थित राहतील.