

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे १८ व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात ६१ हजारपेक्षा जास्त तरुणांना रोजगार नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्रांपैकी एक आहे. भारतातील तरुणांसाठी देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर नव्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
त्यांनी सांगितले की, २०२६ हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरात पराक्रम दिवस साजरा करण्यात आला आणि उद्या, २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाईल, त्यानंतर प्रजासत्ताक दिन येईल. आजचा दिवसही विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले, कारण याच दिवशी संविधानाने 'जन गण मन' हे राष्ट्रगीत आणि 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले.
या महत्त्वाच्या दिवशी ६१ हजारांहून अधिक तरुण शासकीय सेवांसाठी नियुक्तीपत्रे स्वीकारून आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करत आहेत, असे त्यांनी सांगितले. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्मितीसाठीचे आमंत्रण असून, विकसित भारत घडवण्याच्या संकल्पासाठीची ही बांधिलकी आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
अनेक तरुण राष्ट्रीय सुरक्षेला बळकट करतील, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला सक्षम करतील, वित्तीय सेवा व ऊर्जा सुरक्षेला मजबुती देतील आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे त्यांनी नमूद केले. सर्व तरुणांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, शासकीय भरती प्रक्रियेला मिशन मोडमध्ये आणण्यासाठी रोजगार मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. कालांतराने हा उपक्रम एक संस्था बनला असून, यामधून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. ही मोहीम पुढे नेत आज देशभरात चाळीसहून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीमुळे बांधकामाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत. भारतातील स्टार्टअप परिसंस्था वेगाने विस्तारत असून, सुमारे दोन लाख नोंदणीकृत स्टार्टअप्समध्ये एकवीस लाखांहून अधिक तरुणांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदवले.