

नाशिक : सतीश डोंगरे
सह्याद्रीच्या डोंगररांगांतील आणि आदिवासी भागातील रानमेव्याला आता वाइन उद्योगाचे मूल्यवर्धन लाभत असल्याने, जांभळाचा हंगाम हजारो आदिवासी बांधवांच्या हाताला रोजगार घेऊन येणारा ठरत आहे. राज्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत जांभूळ संकलनाच्या स्वरूपात उपलब्ध झाला असून, यंदाचा हंगाम आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम ठरत आहे.
पाऊस लांबल्यामु आतापर्यंत सुमारे ८ हजार टन जांभळाचे संकलन झाले आहे. 'जांभूळ ते वाइन' यशस्वी प्रयोगामुळे जांभूळ विक्रीतून दररोज कोट्यावधींची उलाढाल होत आहे. नाशिक, पालघर, नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, सातारा, महाबळेश्वर परिसर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात जांभूळ आढळते.
विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांतील आदिवासी पट्ट्यात जांभूळ संकलन हा महत्त्वाचा हंगामी व्यवसाय आहे. जांभळाची लागवड मर्यादित असली, तरी जंगलातील नैसर्गिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
राज्य शासनाकडे जांभळासाठी स्वतंत्र अधिकृत उत्पादन आकडेवारी उपलब्ध नसली, तरी वनउत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, राज्यातील विविध आदिवासी पट्ट्यांतून यंदा ८ हजार टनांपर्यंत जांभळाचे संकलन झाल्याचा अंदाज आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे हे प्रमाण अवघे चार ते साडेचार हजार टन होते. यंदा मात्र, पाऊस लांबल्यामुळे जांभळाचा हंगाम जून अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. जांभळाचा मोठा हिस्सा वाइननिर्मितीसाठी वापरला जात असल्यामुळे जांभूळ संकलनातून आदिवासींचे अर्थकारण बदलत आहे.
अहिल्यानगरमध्ये जांभूळ वाइन प्रयोग
नाशिकबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी तसेच इतर खासगी कृषी प्रक्रिया प्रकल्पांनी जांभूळ न्वाइन निर्मितीचा प्रयोग केल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी हे प्रयोग व्यावसायिक पातळीवर, तर काही ठिकाणी संशोधन व मूल्यवर्धन प्रकल्प म्हणून राबविले जात आहेत. जांभळातील नैसर्गिक रंगद्रव्ये, अँटिऑक्सिडंट्स आणि वैशिष्ट्यपूर्ण चव यामुळे जांभळाची निर्यातदेखील केली जात आहे.
यंदा जांभळला चांगला भाव
यंदाच्या हंगामात किरकोळ बाजारात जांभळाला ५०० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळाला. शेतकरी व संकलक स्तरावर हा भाव साधारण ५० ते १५० रुपये प्रतिकिलो राहिल्याचे व्यापारी सांगतात. प्रक्रिया उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दर्जानुसार स्वतंत्र भाव ठरविले जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला भाव मिळाल्याने, आदिवासी बांधव सुखावला आहे.
वाइनमुळे वाढली जांभळाला मागणी
जांभळापासून वाइननिर्मितीचा नाशिकमध्ये यशस्वी प्रयोग करण्यात आला असून, या प्रकल्पातून आतापर्यंत ४,२०० इतकी रोजगारनिर्मिती झाली आहे. कंपनीकडून जांभळाची खरेदी स्थानिक आदिवासी समुदायांकडून केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील पाच भागांमधील १,२०० आदिवासी संकलकांकडून जांभूळ खरेदी केली जात होती. आता हे प्रमाण १,८०० पर्यंत गेले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, राज्यभर जांभूळ संकलन, वर्गीकरण, वाहतूक आणि प्रक्रिया या साखळीत ८ ते १० हजार कुटुंबीयांना हंगामी रोजगार मिळत आहे