

पणजी : प्रभाकर धुरी
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गोवा ते मुंबई, पुणे या मार्गावर धावणाऱ्या खासगी प्रवासी गाड्यांचे तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत. हे दर ऐन दिवाळीत तिप्पट झाले आहेत. खासगी बसेसचे तिकीट दर हे गणेशोत्सव, दिवाळी आणि मे महिन्यात प्रवाशांचा ओघ असेल त्याप्रमाणे वाढवले जातात.
येताना प्रवाशांची संख्या अधिक असेल, तर दर अधिक व जाताना प्रवासी संख्या कमी म्हणून दर कमी असा प्रकार असतो. आता जातानाचे दर कमी आहेत. अगदी 600 पासून 900 पर्यंत, तर येतानाचे दर 1,500 ते 3 हजारपर्यंत प्रति प्रवासी आहेत. मुंबई, पुणे, बंगळूर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस धावतात. पणजी - बंगळूर एसी बसचा तिकीट दर 800 ते 1,800 तर येतानाचा दर 1,300 ते 2,800 एवढा आहे. तिकिटाचा दर हा त्या त्या बस ऑपरेटर्सवर अवलंबून असतो. प्रवासाचा हंगामही यात महत्त्वाचा घटक असतो.
मोठ्या सुट्टीच्या काळात किंवा जास्त गर्दीच्या काळात तिकीट दर अधिक असतो. तसेच तुम्ही दिवसा प्रवास करता की रात्री किंवा तुम्ही वीकेंडला प्रवास करत असाल, तरही तिकीट दरात बदल होतो. त्यासोबतच तुम्ही कुठल्या प्रकारची बस प्रवासासाठी निवडता त्यावरही तुमच्या प्रवासाचा तिकीट दर अवलंबून असतो. दुसरीकडे कदंब महामंडळाच्या बसेसचा दर कायम समान असतो. तो हंगामानुसार कमी जास्त होत नाही.
पणजी-बंगळूर मार्गावर धावणाऱ्या कदंबाचा तिकीट दर 1,100 ते 1,700 च्या दरम्यान असतो. पणजी-पुणे, मुंबई तिकिटाचा कदंबचा दर साधारणतः 1,400 पर्यंत असतो. तर महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसी सीटर बसचा (एसटी) पणजी-पुणे प्रवासदर 875 ते 1,070 रुपयांपर्यंत असतो.