

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ लवकर पूर्ण करा, अशी मागणी खासदार सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेत केली. तानावडे यांनी राज्यसभेत या महामार्गाच्या कामातील विलंबाबाबत शून्य प्रहराला गंभीर चिंता व्यक्त केली. तानावडे म्हणाले, हा महामार्ग कोकण विभाग आणि गोव्याची मुख्य जीवनवाहिनी आहे.
पर्यटन, व्यापार, मालवाहतूक आणि एकूणच प्रादेशिक विकासामध्ये हा महामार्ग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. एका दशकाहून अधिक काळापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या या चार पदरी महामार्ग प्रकल्पाचा मुख्य उद्देश संपर्क व्यवस्था सुधारणे, रस्ते सुरक्षा वाढवणे आणि मुंबई व गोव्यादरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवासी व पर्यटकांचा प्रवासाचा वेळ कमी करणे हा आहे.
या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास मालवाहतुकीला मोठा फायदा होईल. संपूर्ण विभागातील उद्योग, कृषी, मत्स्यव्यवसाय आणि लहान व्यवसायांना चालना मिळेल. असे तानावडे म्हणाले. तानावडे पुढे म्हणाले, भूसंपादनाचे प्रश्न, पर्यावरणीय मंजुऱ्यांमधील विलंब, आराखड्यातील बदल, कंत्राटदारांशी संबंधित समस्या आणि वाहतूक व्यवस्थापनातील आव्हाने यामुळे या प्रकल्पाच्या कामात सतत विलंब होत आहे.
त्यामुळे महामार्गाचे अनेक टप्पे अजूनही अपूर्ण आहेत. तिथे वाहतुकीचे अडथळे, अर्धवट पूल आणि रस्त्यांची दयनीय अवस्था दिसून येत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते.
कालमर्यादा निश्चित करा...
पावसाळा जवळ येत असल्याने महामार्गाची उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलली जावीत. तसेच, या प्रकल्पाशी संबंधित सर्व घटकांमध्ये अधिक चांगला समन्वय साधला जावा. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी एक स्पष्ट कालमर्यादा निश्चित करून ती जाहीर केली जावी, अशी मागणी तानावडे यांनी केली.