

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव सडा येथील जंक्शन परिसरात उभारलेल्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या कायदेशीर पेचप्रसंगाकडे दुर्लक्ष करून, शेकडो मुरगाववासियांच्या उपस्थितीत ढोल-ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शिवजयंतीचे औचित्य साधून मुरगाव सडा येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
शिवप्रेमींनी सडा येथील मोकळ्या जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे शिवजयंतीदिनी सायंकाळी अनावरण करण्यात आले. न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली असल्याने हा पुतळा वादग्रस्त ठरण्याची शक्यता व्यक्त आहे, हा पुतळा खासगी जागेत उभारल्याने तो बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच संबंधित सरकारी यंत्रणांना तो हटवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुतळ्याचे अनावरण झाले असले, तरी त्यावर कायदेशीर अनिश्चिततेची टांगती तलवार कायम राहणार आहे. परिणामी, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवरही स्थानिक शिवप्रेमींनी पुतळ्याचे उत्साहात अनावरण करण्याचा निर्धार केला आणि गुरुवारी सायंकाळी हेडलॅण्ड सडा नाक्यावर हा सोहळा शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत झाला.
हेडलॅण्ड सडा व परिसरातील शिवप्रेमींकडून अनेक वर्षांपासून सडा नाक्यावरील मार्केट प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या खुल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे प्रयत्न सुरू होते. मागील काही दिवसांत कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ करून मंगळवारी रात्री त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला.
तात्पुरत्या सोयीसाठी लोखंडी चौथऱ्याची उभारणी केली. गुरुवारी या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. मात्र, ज्या ठिकाणी पुतळा उभारला आहे ती जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा एमपीएने केला आहे. पुतळा उभारण्यास एमपीएच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता; तरीही शिवप्रेमींनी काम सुरूच ठेवले.
याबाबतची माहिती पसरताच बुधवारी दिवसभर वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. शिवप्रेमी कार्यकर्त्यांसह भाजपचे जयंत जाधव, डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, प्रसाद प्रभुगावकर, शांताराम पराडकर, प्रेमानंद केरकर आदींनी एकत्र येऊन एमपीएच्या भूमिकेचा निषेध करत टीकाही केली.
याहून मोठी शोकांतिका कोणती : आमोणकर गेल्या दोन वर्षांपासून एमपीएकडे विनावापर पडून असलेल्या जागेची मागणी करत होतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही एमपीएला निवेदन पाठवले होते. तसेच केंद्रीय जहाजोद्योग मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले, मात्र ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आमचा संयम सुटला आणि शेवटी शिवाजी महाराजांची प्रतिमा उभारावी लागली. शिवरायांचा पुतळा उभारण्यास आडकाठी येत असेल तर याहन मोठी शोकांतिका कोणती, अशी खंत आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केली.
उच्च न्यायालयात याचिका; सोमवारी सुनावणी
या पार्श्वभूमीवर एमपीएने सदर पुतळा उभारण्याच्या कृतीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उपजिल्हाधिकारी, पोलिस आणि मुरगाव पालिका यांना प्रतिवादी करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. या याचिकेवर येत्या २३ रोजी सुनावणी होणार आहे.