

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अमली पदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पोलिस पथकाने (एएनसी) आल्त पर्वरी येथील एका निवासी संकुलात बेकायदेशीरीत्या गांजाची लागवड केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील दोन व गोव्यातील एकाला अटक केली आहे. ड्रग्ज पुरवठा व खरेदी करणाऱ्यांचे हे मोठे रॅकेट असून कक्षाचे पोलिस सखोल चौकशी करत आहेत. आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये वेदांत विनय देशपांडे (रा. छ. संभाजीनगर, महाराष्ट्र), मयूर मुरलीधर कोल्हे (रा. नागपूर, महाराष्ट्र) व मुस्तफा गफर मोतीवाला (रा. पर्वरी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी बुधवारी (दि. १८) मध्यरात्री घातलेल्या या छाप्यावेळी सुमारे १.२९ लाख किमतीचा गांजा जप्त केला होता.
संशयित वेदांत व मयूर या दोघांना ५ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली असून संशयित मुस्तफा याला दि. २० रोजी पोलिस कोठडीसाठी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वेदांत याने नागपूर येथे हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मयूर हा त्याचा साथीदार आहे.
वेदांत २०२२ मध्ये गोव्यात आला आहे. पर्वरी येथील एका निवासी संकुलात भाडेपट्टीवर घर घेतले असून त्याने त्या परिसरात गांजाच्या रोपांची लागवड केली आहे. काही दिवासांपूर्वी त्याने १ किलो गांजा गोव्याबाहेरून आणला होता व राज्यातील अनेक भागांतून आलेल्या मागणीनुसार पुरवठा केला आहे.
त्यामुळे या रॅकेटमध्ये अनेकजण गुंतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांची माहिती जमा करण्याचे प्रयत्न पोलिस करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तिघाही संशयितांकडून मोबाईल फोन जप्त केले आहेत. गांजाची विक्री करण्यासाठी हे तिघेही या मोबाईल फोन्सचा वापर करत होते. त्यामुळे त्यांनी गांजाचा पुरवठा केलेल्यांची फोन क्रमांक पोलिसांच्या हाती लागले आहेत.
संशयित हे पर्वरीतील मॉल दी गोवा तसेच हॉटेल मॅनेजमेंट परिसरातच राहत असल्याने त्यांचा संपर्क तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी असणाचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेनेही गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळवण्यात येत असल्याचे सूत्राने सांगितले.
भाडेपट्टीवर दिलेल्या निवासी संकुलाचे मालक हे परदेशात असून त्यांच्या नातेवाईकाकडे त्याचा ताबा आहे. संशयितांना भाडेपट्टीवर घर देताना त्यांची भाडेकरून पडताळणी अर्ज पर्वरी पोलिस स्थानकात दाखल केला होता तसेच काय करार केला होता याची चौकशी करण्यासाठी मालकाच्या नातेवाईकांना उद्या बोलावण्यात आले आहे
असे पोलिस सूत्राने माहिती दिली. प्राथमिक तपासात संबंधित ठिकाणी गांजाची जाणूनबुजून लागवड व साठवण केल्याचे संकेत पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विकेश हडफडकर करत असून, निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क व अधीक्षक सुनिता सावंत यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.