

दाबोळी : वृत्तसेवा
मुरगाव पालिकेचे नवीन मासळी मार्केटचे मोठ्या धुमधडाक्यात लोकार्पण सोहळा पार पडला. यामुळे येथील मासळी, भाजी व फळ विक्रेत्यांचे ताप्नुरते देव दामोदर ट्रस्ट महसूल विभागाच्या जागेत स्थलांतर करण्यात आले होते.
आता नवीन मार्केट उभारले असून मुरगाव पालिकेने मासळी व्यवसायिक, भाजी व फळ विक्रेत्यांना मंगळवार (दि.१३) पासून नवीन मार्केटमध्ये व्यवसाय करण्याचे आदेश दिले आहेत. जर एखाद्या विक्रेत्याने आदेशाचे पालन केले नाही तर, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी दिला आहे.
मुरगाव पालिकेतर्फे नवीन मासळी मार्केट उभारले असून, या मार्केटमध्ये मासळी व्यवसायिक, भाजी व फळ विक्रेत्यांचा मंगळवार (दि.१३) पासून व्यवसाय सुरू होणार आहे. यात तळमजल्यावर मासळी बाजार तर पहिल्या मजल्यावर फळ, भाजी विक्रेत्यांचा बाजार भरणार आहे. यामुळे शहरात यापुढे मिळेल त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय करता येणार नसल्याचे मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी स्पष्ट केले आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मार्केटमध्ये जर एखाद्या व्यवसायिकाने आपला व्यवसाय सुरू न केल्यास, याचा विपरीत परिणाम समाजावर होतो. यासाठी पालिकेने सोमवार (दि.१२) रोजी तात्पुरत्या मासळी बाजार व फळ-भाजी मार्केटमध्ये जाऊन, मंगळवार (दि.१३) पासून तिनही बाजार नवीन मार्केटमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी त्यांच्या समवेत लेखा अधिकारी पूनम नाईक, पालिका निरिक्षक सचिन पडवळ, सेनेटरी निरीक्षक महेश कुडाळकर, सोपो गोळा करणारे शशीकांत वेळीप व इतर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
जर पालिकेच्या आदेशाचे पालन केले नाही, तर प्रत्येकावर दंडात्मक कारवाई बरोबर त्याचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.
- गिरीष बोरकर, नगराध्यक्ष