

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात कार्यरत असलेले विविध ऑनलाईनफूड डिलिव्हरी एजंट्स वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वेळेत अन्नपदार्थ डिलिव्हरी करण्यासाठी हे डिलिव्हरी बॉय नियमभंग करून बेदरकारपणे गाड्या चालवतात.
परिणामी अपघात होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहतूक मंत्र्यांचे या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष असल्याची टीका सर्वत्र सुरू आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसाय राज्यभरामध्ये पसरला असून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. याद्वारे अन्नपदार्थ, घरातील जिन्नस फास्ट फूड त्या त्या अॅपवरून ऑनलाइन पद्धतीने मागवले जातात.
त्यानंतर विशिष्ट वेळेत ती गोष्ट पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवणे बंधनकारक असते. यामुळे सदर डिलिव्हरी बॉईज अतिवेगाने रहदारीच्या रस्त्यावरही वाहने चालवतात. यामुळे इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनेकदा अपघाताचे प्रसंगही ओढवतात.
सामान्यांना चलन, मग यांना का नाही?
ठिकठिकाणी कार्यरत असलेले वाहतूक अधिकारी सामान्य नागरिकांच्या वाहन वेगावर बारीक लक्ष ठेवून असतात. नियमभंग झाल्यास त्वरित चालकांना दंड आकारला जातो. मात्र सुसाट वेगाने गर्दीतून वाकडी-तिकडे वाहने चालवणाऱ्या या डिलिव्हरी कामगारांना मात्र कधी कुठल्या वाहतूक अधिकाऱ्यांनी थांबवल्याचे अद्याप दिसलेच नाही, अशी टीका होत आहे. यात मंत्र्यांचे स्पष्ट अपयश असून मंत्री गुदिहो यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.