

वास्को : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव पालिकेच्या प्रभागांची संख्या २५ वरून २७ वर नेल्याने इच्छुक उमेदवार तसेच मावळत्या नगस्सेवक नगरसेविकांमध्ये खुशीचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत राजकीय पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसमवेत प्रचार करून छाप टाकावी लागणार आहे. त्यामुळे कितीजणांना तिकीटे मिळणार यासंबंधी येथे उलटसुलट चर्चा सुरू आहे.
मावळत्या नगरसेवक, नगरसेविकांपैकी बहुतांश पुन्हा निवडणूक लढविणार असल्याने ते आपल्या राजकीय बॉससमवेत दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील मतदारांशी संपर्क साधण्यास आरंभ केला आहे. मुरगाव पालिका मंडळाची पहिली निवडणूक १९७० मध्ये झाली होती. त्यावेळी १५ प्रभाग होते. तसेच एक स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लावण्यात येत होती. १९८५ मध्ये प्रभागांची संख्या १५ वरून १८ वर गेली होती. १९९५ मध्ये या प्रभागांच्या संख्येत पुन्हा वाढ करताना संख्या २० वर नेण्यात आले. तर स्वीकृत सदस्यांची सख्या ३ वर नेण्यात आली होती.
२००० साली संख्या २० राहिली असली तरी स्वीकृत सदस्याची संख्या तीनवरून एकवर आली होती. २०१५ मध्ये प्रभागाची संख्या २० वरून २५ वर नेली होती. मार्च २०२६ मध्ये मतदारांच्या संख्येनुसार प्रभागाची रचना करताना ४ प्रभाग कमी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. यामुळे इच्छुक उमेदवार हिसमुसले झाले होते. त्यानंतर लोकसंख्येनुसार प्रभागाची संख्या ठरणार असल्याचे जाहीर झाल्याने त्या इच्छुक उमेदवारांच्या जीवातजीव आला होता.
आता लोकसंख्येनुसार प्रभागात दोनची वाढ झाल्याचे संबंधित इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदी वातावरण पसरले आहे. सध्या मुरगाव मतदारसंघात ९ वास्को मतदारसंघात १२ तर दाबोळी मतदारसंघात ४ प्रभागांचा समावेश होता.
२०२१ मध्ये मुरगाव मतदारसंघातून तत्कालीन आमदार मिलिंद नाईक यांच्या ७ समर्थक तर संकल्प आमोणकर यांचे दोन समर्थक जिंकले होते. वास्को मतदारसंघातही तत्कालीन आमदार कार्नुस आल्मेदा यांचे ९-१० समर्थक, तर दाजी साळकर यांचे दोन समर्थक जिंकले होते. दाबोळी मतदारसंघातून मंत्री माविन गुदिन्हो यांचे ३ समर्थक जिंकले होते. आता परिस्थिती बदलली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद नाईक व कार्ल्स आल्मेदा हे पराभूत झाले तर संकल्प आमोण कर व दाजी साळकर हे आमदार झाले.
तथापी मिलिंद नाईक यांचे ते सात समर्थक अद्याप त्यांच्यासमावेत आहेत. त्यांनी आमोणकर यांच्या कार्यक्रमाला कधी हजेरी लावली नाही. त्यामुळे तेथे आमदार आमोणकर हे नवीन चेहऱ्यांना उभे करणार असल्याने त्यांच्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह नाही. वास्को मतदारसंघात आल्भेदा यांचे समर्थक आता आमदार साळकर यांच्यासह आहेत. त्यांच्या निरनिराळ्या कार्यक्रमाला उपस्थित लावत आहेत. तसेच इतर इच्छुक उमेदवाराही साळकर यांच्यासमावेत फिरत आहेत. त्यामुळे कोणाला तिकीट मिळणार याबद्दल त्या सर्वासमोर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
सीमांकनावर अनेकांचे लक्ष
आपण विधानसमा निवडणुकीसाठी मोठे काम केले आणि पालिका निवडणुकीसाठी आपल्या नावाचा विचार झाला नाही, तर आपले काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. प्रभागांची संख्या सत्तावीसवर गेली असली, तरी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीटे कोणाला मिळणार हा खरा प्रश्न आहे. २७ प्रभाग झाल्याने आता प्रभागांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे सीमांकन कसे होते याकडेही उच्छुकांचे लक्ष आहे. सीमांकन व निवडणुक कधीही होवो तोपर्यंत आपला प्रचार करून आपले नाव मतदारांपर्यंत पोहवण्यासाठी इच्छुकांची धडपड चालली आहे.