पेडणे : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशन, गोवा) ५ मे २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे मोपा विमानतळ परिसरातील स्थानिक नागरिक, टॅक्सी चालक, व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आदेशानुसार, एनएच १६६ एस (NH-1665) सहा लेन एक्स्प्रेस वे सुरू होण्यापूर्वी सर्वसामान्य वाहतुकीसाठी वापरला जाणारा प्रवेशमार्ग आता मर्यादित स्वरूपात ठेवण्यात आला आहे.
या मार्गाचा वापर केवळ शासकीय वाहने, वैध ओळखपत्र असलेले विमानतळ कर्मचारी, पोलीस स्टेशनसाठी जाणारे ग्रामस्थ आणि आपत्कालीन परिस्थितीतील वाहनांनाच करता येणार आहे. या निर्णयामुळे मोपा, पेडणे, धारगळ, कासारवर्णे, उगवे, मोप, तांबोसे, तोरसे, इब्रामपूर, हणखणे, हळर्ण, तलार्णा आणि वझरी परिसरातील नागरिकांसाठी विमानतळ परिसरात पोहोचणे अधिक कठीण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पूर्वी काही मिनिटांत गाठता येणाऱ्या विमानतळासाठी आता धारगळमार्गे मोठा वळसा घालावा लागणार आहे. या अधिसूचनेचा अर्थ स्पष्ट करताना स्थानिकांनी सांगितले की, विमानतळाजवळील पूर्वीचा प्रवेशमार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला राहणार नाही. हा रस्ता केवळ विमानतळ प्रशासन, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि अधिकृत वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे या आदेशातून स्पष्ट होत आहे. स्थानिक ग्रामस्थांना केवळ पोलीस स्टेशन किंवा अत्यावश्यक कामांसाठी मर्यादित प्रवेश देण्यात येणार असल्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे "विमानतळ आमच्या गावात, पण प्रवेश मात्र आमच्यासाठी बंद" अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांना आता विमानतळ गाठण्यासाठी तब्बल १८ ते २० किलोमीटर अतिरिक्त अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि आर्थिक खर्चात मोठी वाढ होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. मोपा विमानतळ परिसरातील स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
विमानतळाच्या शेजारी राहूनही धारगळमार्गे वळसा घेऊन जावे लागणार असल्याने त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालये किंवा इतर कामांसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा नागरिकांना तातडीच्या सेवा मिळण्यात विलंब होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हा प्रश्न केवळ रस्त्याचा नसून स्थानिकांच्या हक्कांशी संबंधित असल्याचेही त्यांनी नमूद केले. दख्यान, हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्ववत खुला करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र गावकर, पेडणे काँग्रेस गटाध्यक्ष कृष्णा नाईक, मोपा पिढीत जनसंघटनेचे सदस्य भास्कर नारुलकर, संजय अरोस्कर, सागर कारापूरकर आणि उदय महाले यांनी केली आहे. या निर्णयानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. विमानतळामुळे स्थानिकांचे जीवन सुलभ होण्याऐवजी अधिक कठीण होत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
स्थानिकांचे जीवन सुलभ मोपा विमानतळामुळे स्थानिकांना रोजगार, सुविधा आणि विकास मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, विमानतळाच्या अगदी जवळ राहूनही स्थानिकांना १८ ते २० किलोमीटरचा वळसा घालावा लागत असेल, तर हा स्थानिकांवर अन्याय आहे. हा रस्ता फक्त कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि विमानतळाशी संबंधित लोकांच्या फायद्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे.
- उदय महाले, स्थानिक नागरिक