Mirabag Goa Protest | लढा गावाच्या अस्तित्वाचा, मान परंपरेचा! मिराबागेत आंदोलनाच्या आगीतही पेटली संस्कृतीची 'चूल'

Mirabag Goa Protest | मिराबागमधील चित्र; गाव वाचविण्याच्या लढ्यातही शिमग्याची जोपासली संस्कृती
Mirabag Goa Protest
Mirabag Goa Protest
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गावाच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या लढ्याला यंदा शिमग्याच्या परंपरेची उब लाभली. मीराबाग येथे बंधाऱ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या मंडपातच गृहिणींनी चूल पेटवून शिमग्याच्या मेळांसाठी चांदणे जेवण तयार केले आणि संघर्षाच्या वातावरणातही संस्कृतीचा दिवा विझू दिला नाही.

Mirabag Goa Protest
Nashik Onion Crisis | कांदा रडवतोय की सरकार? निर्यात धोरणातील 'धरसोड' वृत्तीमुळे नाशिकचा शेतकरी देशोधडीला

गावाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन यांचा अनोखा संगम घडवत आंदोलनाला भावनिक बळ दिले. मीराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधातील आंदोलनाला वीस दिवस पूर्ण झाले असून ग्रामस्थांचा निर्धार अधिकच ठाम झाला आहे.

पंचायत व जलस्रोत खात्याच्या कार्यालयावर मोर्चे, मशाल रॅली, निवेदने अशा विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कामधंदा बाजूला ठेवून नागरिक आंदोलनाच्या मंडपात ठाण मांडून बसले आहेत. विशेष म्हणजे महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरत आहे.

जुवारी नदीवर सुमारे २८० कोटी रुपये खर्चुन बंधारा उभारण्याचा प्रस्ताव असून या प्रकल्पामुळे नदीकाठच्या सुमारे पाचशे घरांवर संकट येईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. भरतीच्या वेळी खारे पाणी वर येणे आणि ओहोटीच्या वेळी गोडे पाणी समुद्रात जाणे ही नदीची नैसर्गिक प्रक्रिया आहे.

बंधारा उभारल्यास हा समतोल बिघडून शेती, बागायती तसेच किनाऱ्यालगतची घरे धोक्यात येतील, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. दीड वर्षांपूर्वी प्रकल्पाची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. लोकांना विश्वासात न घेता खारफुटी नष्ट करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी कंत्राटदाराला काम बंद पाडले होते. त्यानंतर प्रस्तावित जागा बदलून मीराबाग पुलाखाली काम सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्यानंतर मीराबाग, कुडचडे आणि सांगे परिसरातील नागरिक एकत्र येत आंदोलन छेडण्यात आले.

बंधाऱ्याच्या कामासाठी नदीकाठावर खोदण्यात आलेला मोठा खड्डा अजूनही बुजवण्यात आलेला नसून तो स्थानिक नागरिक व पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरत असल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे. याबाबत जलस्रोत खात्याच्या सांग कार्यालयावर मोर्चा काढूनही प्रशासनाने निर्णायक भूमिका घेतलेली नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, आंदोलनाला विविध राजकीय नेते व पर्यावरणप्रेमींचा पाठिंबा मिळत आहे. आमदार विजय सरदेसाई, खासदार विरियातो फर्नांडिस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार विनय तेंडुलकर तसेच आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देत समर्थन दर्शवले. पर्यावरणप्रेमी अभिजीत प्रभुदेसाई यांचे मार्गदर्शन आंदोलकांना लाभत आहे. रविवारी शिमगोत्सवाची सुरुवात होताच गावात मेळ पथके दाखल झाली.

Mirabag Goa Protest
Nashik Human Trafficking Case | इव्हेंटच्या कामाचे आमिष अन् थेट लग्नाचा मांडव! 19 वर्षीय तरुणीची 2 लाखांत विक्री...

परंपरेनुसार त्यांना घराघरांत जेवण वाढले जाते; मात्र आंदोलनामुळे ग्रामस्थ मंडपातच राहत असल्याने गृहिणींनी आंदोलनस्थळीच चूल मांडली. गावातून एकही मेळ उपाशी जाऊ नये याची काळजी घेत महिलांनी स्वतः स्वयंपाक करून चांदणे जेवण वाढले. संघर्षाच्या मध्यभागी उभ्या राहुह्नही परंपरेचा मान राखणाऱ्या महिलांनी आंदोलनाला नवी ऊर्जा दिली.

.... तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : भंडारी

आंदोलनाचे नेतृत्व करणारे संकेत भंडारी यांनी 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले की, 'बंधाऱ्याचा प्रकल्प कायमचा रद्द झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. गाव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढा सुरू राहील.' महिलाही मोठ्या संख्येने पुढे आल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले असून सरकारचे डोळे उघडेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

संघर्ष नव्हे; लोकलढा...

मीराबाग येथे सुरू असलेले आंदोलन केवळ बंधा-याविरोधातील संघर्ष राहिलेला नाही, तर गाव, पर्यावरण आणि परंपरा वाचवण्याचा लोकलढा बनला आहे. आंदोलनाच्या मंडपात पेटलेली गृहिणींची चूल ही संघर्षाची नव्हे तर संस्कृती टिकवण्याची ज्योत ठरत असून महिलांच्या सहभागामुळे आंदोलनाला भावनिक आणि सामाजिक बळ प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news