Panaji Municipal Election Result 2026 | तीरावरल्या सुख-दुःखांची जाणीव तिजला नाही...

Panaji Municipal Election Result 2026 | राज्यातील आंदोलने, राजधानीतील आक्रोश आणि परवा लागलेला पणजी महापालिकेचा निकाल याची तुलना एका भावगीताशी करता येईल.
Panjim Babush Monserrate
Panjim Babush Monserrate
Published on
Updated on
Summary

पणजी महापालिका निवडणुकीकडून विरोधकांना खूप अपेक्षा होत्या. सरकारविरोधी आंदोलने, एकत्र आलेले विरोधक, रस्त्यावर उतरलेली जनता या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी सर्व त-हेने योग्य अशी नेपथ्यरचना झाली होती. मात्र, या निवडणूक निकालाने जुन्याच निकालाची पुनरावृत्ती घडवून आणली. पणजी महापालिकेच्या या निवडणुकीतून विरोधकांनी काय धडा घ्यायचा?

मयुरेश वाटवे

राज्यातील आंदोलने, राजधानीतील आक्रोश आणि परवा लागलेला पणजी महापालिकेचा निकाल याची तुलना एका भावगीताशी करता येईल. निवडणूक निकाल ही जणू कृष्णामाई आहे आणि विरोधक म्हणतात.... संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखांची जाणीव तिजला नाही.... निवडणुकीपूर्वी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचा मोठा प्रयत्न झाला होता.

Panjim Babush Monserrate
Nashik Gas Cylinder Booking 2026 | बुकिंगनंतर तीन दिवसांत गॅस सिलिंडर घरपोच

गेल्या पाच वर्षांतील कथित गैरकारभार, स्मार्ट सिटीच्या कामांमुळे नागरिकांना झालेल्या अडचणी, कॅसिनोविरोधी आंदोलन, तसेच विविध विरोधी पक्ष व स्थानिक गटांची एकजूट अशा अनेक घटकांच्या आधारावर सत्ताधाऱ्यांविरोधात मोठा असंतोष आहे, असा दावा केला जात होता. मीडिया आणि सोशल मीडियावरही हा सूर सातत्याने उमटत होता.

अनेकांना वाटत होते की या वेळी बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनेलला मोठा धक्का बसेल. मात्र निकाल लागल्यानंतर चित्र पूर्णपणे वेगळे दिसले. बाबूश यांच्या पॅनेलने केवळ विजय मिळवला नाही, तर मागील वेळेपेक्षा दोन जागा जास्त मिळवून आपली पकड अधिक मजबूत केली. मग राज्यातील आंदोलने आणि पणजीतील लोकांचा आक्रोश हा केवळ भ्रम होता का? या निकालाने एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

मीडिया आणि सोशल मीडियात दिसणारे वातावरण आणि प्रत्यक्ष मतदारांमधील भावना यामध्ये इतका फरक का? अनेकदा सत्ताधाऱ्यांविरोधात अंडरकरंट आहे असे सांगितले जाते. मात्र या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असलेला सकारात्मक अंडरकरंट कोणालाच का दिसला नाही? याचे उत्तर शोधताना गोव्याच्या राजकारणातील काही वैशिष्ट्यांकडे लक्ष द्यावे लागते. गोव्यातील निवडणुका केवळ पक्षीय पातळीवर लढल्या जात नाहीत.

व्यक्तिमत्त्व, स्थानिक संबंध, मतदारांशी असलेला संपर्क आणि प्रत्यक्ष कामे यांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे राज्यस्तरावर सरकारविरोधी नाराजी असली तरी प्रत्येक प्रभागात किंवा मतदारसंघात ती तशीच प्रतिबिंबित होते असे नाही. पणजी महापालिका निवडणुकीत २३ प्रभागांत थेट निवडणूक झाली होती. त्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी खरी कसोटी होती. विरोधकांनी अनेक प्रभागांत संयुक्त उमेदवार उभे केले होते. तरीही अनेक ठिकाणी बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनेलने चांगल्या मताधिक्क्याने विजय मिळवला. याचा अर्थ असा की मतदारांनी स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या कामगिरीकडे पाहून मतदान केले.

अनेक प्रभागांत बाबूश पॅनेलचे उमेदवार गेली अनेक वर्षे नागरिकांशी संपर्कात होते. स्थानिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यामुळे मीडिया आणि सोशल मीडियात तयार झालेले सरकारविरोधी वातावरण प्रत्यक्ष मतदानात दिसले नाही. गोव्याच्या राजकारणात आंदोलनांचा प्रभाव मर्यादित असतो, हे या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आले. निवडणुकीच्या काही दिवस आधी कॅसिनोविरोधात मोठी आंदोलने झाली होती. अनेक सामाजिक संघटना आणि स्थानिक गट या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला प्रसिद्धीमाध्यमांचे कव्हरेजही मिळाले. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम निवडणुकीत दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र निकाल पाहता या आंदोलनाचा मतदानावर अजिबातच परिणाम झालेला दिसत नाही. हे पहिल्यांदाच घडले असे नाही. गोव्यात यापूर्वीही अनेक मोठी आंदोलने झाली, पण त्याचा निवडणुकांवर थेट परिणाम दिसला नाही. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळसाविरोधी आंदोलन झाले होते. डबल ट्रॅकिंगला विरोध झाला होता. जुने गोवेतील बंगल्याविरोधातील आंदोलनही पेटले होते. हजारो लोक रस्त्यावर आले होते. मात्र त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसला नाही. अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधाऱ्यांशी संबंधित उमेदवार पुन्हा निवडून आले.

खाणबंदीनंतर आंदोलन झाले तेव्हाही खाणव्याप्त भागातील मतदारसंघांत सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार निवडून आले होते. मोपा विमानतळाच्या बांधकामाविरोधातही मोठे आंदोलन झाले होते. पर्यावरणीय परिणाम, स्थानिकांच्या समस्या आणि विस्थापन या मुद्यांवर अनेक वर्षे आंदोलन चालू होते. या आंदोलनाला राष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्धी मिळाली होती. तरीही या आंदोलनाचा निवडणूक निकालांवर फारसा परिणाम झालेला दिसला नाही.

स्थानिक पातळीवर मतदार अनेकदा वेगळ्याच निकषांवर मतदान करतात. गोव्याच्या राजकारणातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तीप्रधान राजकारण. अनेक मतदार पक्षापेक्षा उमेदवाराला अधिक महत्त्व देतात. एखादा आमदार किंवा नगरसेवक लोकांशी सतत संपर्कात असेल, त्यांच्या अडचणी सोडवत असेल, तर मोठ्या आंदोलनांचा किंवा सरकारविरोधी वातावरणाचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. समाजहितापेक्षा लोक वैयक्तिक लाभांना अधिक महत्त्व देताना दिसत आहेत.

राजकारण्यांनी हे चांगले ओळखले आहे. बाबूश मोन्सेरात यांचे राजकारण याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत पणजी आणि आसपासच्या भागात आपला मजबूत संपर्क तयार केला आहे. स्थानिक पातळीवर अनेकांना त्यांच्याकडून मदत मिळाल्याचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात कितीही मोठे आंदोलन झाले तरी स्थानिक मतदार त्यांच्या बाजूने उभे राहतात. निवडणूक जिंकणे हे आजकाल एक तंत्र झाले आहे असे म्हटले जाते.

संघटनशक्ती, मतदारांशी संपर्क, निवडणूक व्यवस्थापन आणि योग्य उमेदवार निवडणे या सर्व घटकांचा त्यात समावेश असतो. बाबूश मोन्सेरात हे या तंत्राचे चांगले जाणकार मानले जातात. ते पाचही वर्षे मतदारसंघात काम करतात. त्या भागातील तरुणांना नोकऱ्या, क्रीडा स्पर्धा, नरकासुर स्पर्धांना देणग्या, देवस्थाने, इतर कार्यक्रम किंवा अनेकदा वैयक्तिक अडचणी असतील तरीही ते मदत करतात.

मतदारांशी सतत वैयक्तिक संपर्क ठेवून त्यांनी आपले जाळे मजबूत केले आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर अचानक वातावरण तयार करणाऱ्या विरोधकांपेक्षा त्यांना फायदा मिळतो. मीडिया आणि सोशल मीडियाची भूमिका देखील या संदर्भात महत्त्वाची ठरते. आजकाल सोशल मीडियावर निर्माण होणारे वातावरण अनेकदा वास्तवाचे प्रतिनिधित्व करत नाही. काही विशिष्ट गटांच्या भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसतात, पण त्या संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

त्यामुळे सोशल मीडियावर दिसणारे सरकारविरोधी वातावरण प्रत्यक्ष मतदानात दिसेलच असे नाही. पणजी महानगरपालिका निवडणुकीत हे स्पष्टपणे दिसून आले. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा निकाल सरकारसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या आंदोलनांचा परिणाम मतदानावर दिसला असता तर सत्ताधाऱ्यांसाठी ती चिंतेची बाब ठरली असती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सरकार आता अधिक आत्मविश्वासाने आगामी नगरपालिका निवडणुका व फोंडा पोटनिवडणुकीला सामोरे जाईल.

Panjim Babush Monserrate
Nashik Heatwave 2026 | नाशिकमध्ये उन्हाचा कडाका! उष्माघाताचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग 'अलर्ट', जिल्हाभर विशेष कक्ष सज्ज

निवडणुकीपूर्वी होणाऱ्या आंदोलनांचा परिणाम मर्यादित ठेवण्यात सरकारला यश मिळत आहे, असे या निकालावरून दिसते. मात्र ही परिस्थिती विरोधकांसाठी चिंताजनक आहे. मोठ्या आंदोलनांचा परिणामही निवडणूक निकालांवर दिसत नसेल, तर विरोधकांनी आपली रणनीती पुन्हा विचारात घ्यावी लागेल. केवळ आंदोलन करून किंवा सोशल मीडियावर 'नरेटिव्ह' तयार करून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी स्थानिक पातळीवर मजबूत संघटना, सातत्याने काम करणारे कार्यकर्ते आणि मतदारांशी थेट संपर्क आवश्यक असतो.

तसा संपर्क केवळ भाजपचाच आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. एकूणच पणजी महापालिका निवडणुकीचा निकाल हा गोव्यातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्त्वाचा धडा ठरतो. आंदोलन, मीडिया चर्चा आणि सोशल मीडियावरील वातावरण यापलीकडे जाऊन मतदार प्रत्यक्षात कोणत्या निकषांवर मतदान करतात हे समजून घेणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवरील संबंध, उमेदवारांची कामगिरी आणि मतदारांचा असलेला विश्वास यांचा निवडणूक निकालांवर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांसाठी ही बाब सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news