

हरमल : पुढारी वृत्तसेवा
सलग तीन दिवस सुट्टी असल्याने देशी पर्यटकांनी गोव्याला पसंती दिली. हरमल बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. बीच रस्त्यावर वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.
हरमल बीच रस्ता वाहनांनी पूर्णपणे भरला होता. वाहतूक कोंडीमुळे काही वाहनचालकांनी वाहने बाजूला घेऊन कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक पर्यटकांनी पोलिसांच्या नियोजनावर नाराजी व्यक्त करत या भागात वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी केली. मांद्रे पोलिस स्थानकात स्वतंत्र वाहतूक कक्ष नसल्याने पेडणे पोलिस स्थानकातून वाहतूक कर्मचारी मागवावे लागत असल्याचे समजते.
जुनसवाडा फॉरेस्ट पार्कजवळही दोन्ही बाजूंना वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी झाली. पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागत असल्याने वाहनचालक व पर्यटकांनी संताप व्यक्त केला. किनाऱ्यावर प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने महिला पर्यटकांची गैरसोय झाली. वाहतूक कोंडीत तासभर अडकल्याने काही पर्यटकांनी पर्यटन खात्यावर नाराजी व्यक्त केली.
कांदोळीतही कोंडी; वाहतूक पोलिस गायब:
जगप्रसिद्ध कळंगुटसह कांदोळी येथेही पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे सायंकाळी रस्त्यांवर सुमारे तीन ते चार कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुठेही वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले नव्हते.
त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सोसावा लागला. त्यामुळे किनारी भागातील रस्त्यांवर वाहतूक पोलिस तैनात करावेत, अशी मागणी होत आहे. वर्षभर पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा दावा करणाऱ्या सरकारने किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.