

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
'अ' दर्जा प्राप्त असलेल्या मडगाव नगरपालिकेच्या विद्यमान मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मडगाव, फातोर्डा आणि कुडतरी या तीनही मतदारसंघांत मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, विविध पक्ष आणि स्थानिक गटांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
विशेष म्हणजे, यंदाच्या पालिका निवडणुकीत फातोर्थ्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी निवडणुकीच्या माध्यमातून मडगावातील प्रभाव वाढविण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मडगाव नगरपालिका ही मडगाव, फातोर्डा आणि कुडतरी या तीन मतदारसंघांत विभागलेली असली तरी सर्वाधिक प्रभाग मडगाव आणि फातोर्डा मतदारसंघाचा आहे.
त्यामुळे पालिकेतील सत्तेवर या दोन मतदारसंघांचा मोठा प्रभाव राहतो. ज्या आमदाराकडे अधिक नगरसेवकांचे संख्याबळ असते, त्याच्याकडे पालिकेची सत्ता जाते तसेच पालिकेतील सत्ता भविष्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पाया मजबूत करण्यास महत्त्वाची ठरते. त्यामुळे मडगाव पालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता आगामी विधानसभा राजकारणाची रंगीत तालीम मानली जात आहे.
गेल्या पालिका निवडणुकीत मडगाव नगरपालिकेचे एकूण २५ प्रभाग होते. त्यावेळी विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील 'फातोर्डा फॉरवर्ड' गटाने नऊ नगरसेवक निवडून आणत पालिकेत प्रभावी दिगंबर कामत ताकद निर्माण केली होती. मात्र नंतर या गटातील दोन नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने सरदेसाई गटाचे संख्याबळ सातवर आले आणि पालिकेतील सत्तासमीकरणे वेगाने बदलली.
दरम्यान, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या 'मॉडेल मडगाव' गटाला भाजप समर्थक नगरसेवकांची साथ मिळाली. त्यामुळे कामत गटाकडे १६ नगरसेवकांचे संख्याबळ निर्माण झाले आणि त्या बळावर त्यांनी पालिकेवरील नियंत्रण कायम ठेवले.
नगराध्यक्षपदासह पालिकेतील महत्त्वाच्या निर्णयांवरही त्यांचा प्रभाव कायम राहिला. मात्र, आता परिस्थिती पुन्हा बदलताना दिसत आहे. विजय सरदेसाई यांनी मडगाव शहरातील विविध प्रश्नांवर वाढविलेला हस्तक्षेप, व्यापारी आणि नागरिकांशी वाढविलेला संपर्क तसेच पालिका निवडणुकीवर केंद्रित केलेले लक्ष यामुळे आगामी काळात मडगावमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेषतः फातोर्डा आणि मडगावमधील काही प्रभागांत नव्या आघाड्या आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. पालिका मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या प्रशासकीय स्तरावर कामकाज सुरू राहणार असले तरी निवडणुकीची चाहूल लागताच शहरातील राजकीय वातावरण अधिक रंगू लागले आहे. विविध पक्ष आणि स्थानिक गटांमध्ये पडद्यामागील चर्चा सुरू असून, आगामी काळात नव्या राजकीय आघाड्या आणि समीकरणे उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रखडलेली कामे, विकास ठरणार कळीचे मुद्दे
दरम्यान, शहरातील रखडलेली विकासकामे आणि नागरिकांचे प्रश्न हेही निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. सोनसडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प, स्मार्ट सिटीअंतर्गत अपूर्ण कामे, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या, ड्रेनेज व्यवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. अनेक प्रकल्पांची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत झालेल्या विलंबामुळे प्रशासनावर टीका होत आहे.