

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
मडगावच्या ऐतिहासिक हॉस्पिसिओ रुग्णालयाच्या जुन्या मालमतेची मालकी आरोग्य सेवा संचालनालयाच्या नावावर करण्याच्या हालचालींना नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जनतेच्या देणग्या आणि सामाजिक सहभागातून उभारलेल्या हॉस्पिसिओच्या मालमत्तेवर सरकारी विभागाचे नाव मालक म्हणून नोंदविण्याचा आधार काय, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे नेण्यापूर्वी हॉस्पिसिओची जमीन व वास्तू यांची मूळ मालकी अधिकृत कागदपत्रांच्या आधारे निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांच्यासह नागरिकांनी हॉस्पिसिओ ही सुरुवातीपासून जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली संस्था असल्याचे नमूद केले.
केवळ मालमत्ता सरकारी विभागाच्या ताब्यात असल्याने त्या विभागाला मालकी हक्क प्राप्त होतो का, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हॉस्पिसिओच्या मालकीबाबत केवळ सध्याच्या प्रशासकीय नोंदी तपासणे पुरेसे नसून, स्थापनेच्या काळातील जमीन नोंदी, मालकी हक्काची कागदपत्रे, देणग्यांशी संबंधित नोंदी, महसूल अभिलेख आणि त्यानंतर मालकीमध्ये झालेले बदल तपासणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या सर्व नोंदींच्या आधारे अधिकृत सर्वेक्षण करून मालकीची वास्तविक स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली. रुग्णालयीन सेवा नवीन दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित झाल्यानंतर जुनी हॉस्पिसिओ वास्तू मोठ्या प्रमाणावर वापराविना आहे. मात्र, वापर कमी झाला म्हणून मालकीबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नये, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रथम कायदेशीर व ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मालकी निश्चित करावी आणि त्यानंतरच वास्तूच्या भविष्यातील वापराबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली.
वास्तूचा उपयोग जनसुविधांसाठी व्हावा...
हॉस्पिसिओची मालमत्ता जनतेच्या सहभागातून उभी राहिल्याने तिचा भविष्यातील वापर हा सार्वजनिक हिताचा विषय आहे. त्यामुळे मालकी निश्चितीची प्रक्रिया पारदर्शक ठेवून सर्व संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या ऐतिहासिक वास्तूचा आरोग्यसेवा, समाजकल्याण, ज्येष्ठ नागरिकांची सेवा किंवा गरजूंसाठी विविध सुविधांकरिता उपयोग व्हावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
१८६७ साली स्थापना...
उपलब्ध ऐतिहासिक नोंदीनुसार, फादर अँटोनियो जोआओ दि मिरांडा यांनी १३ डिसेंबर १८६७ रोजी मडगावात हॉस्पिसिओची स्थापना केली. सर्वसामान्यांना आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या संस्थेला माध्यमातून मोठा सहभाग मिळाला. पुढील अनेक दशकांत मडगावसह दक्षिण गोव्यातील नागरिकांसाठी हे महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरले.