

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सासष्टी तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी साळ नदी वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, या प्रदूषणामागील मूळ कारणांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मडगाव आणि फातोर्डा परिसरातील मोठ्या प्रमाणातील सांडपाणी विविध नाल्यांद्वारे साळ नदीत मिसळत असल्याचा आरोप होत आहे.
त्यातच शिरवडे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया न केलेले किंवा दूषित पाणी थेट नदीत वाहत असल्याचा प्रकार समोर आल्याने चिंता वाढली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून शिरवडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे तातडीने तांत्रिक लेखापरीक्षण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
साळ नदी ही केवळ जलवाहिनी नसून सासष्टीतील हजारो नागरिकांचे जीवन, शेती, मत्स्यव्यवसाय, खारफुटी आणि पर्यावरणाचा आधार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नदीच्या पाण्याचा रंग, दुर्गंधी आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. नदीचे पाणी अनेक ठिकाणी दूषित होत असून, त्याचा परिणाम नदीकाठच्या गावांवरही होत असल्याचा आरोप केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी केला.
मडगाव आणि फातोर्डा शहरातून निर्माण होणारे सांडपाणी नाल्यांद्वारे शिरवडे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात पोहोचविले जाते. मात्र, या प्रकल्पाबाहेर दररोज सांडपाण्याच्या टँकरच्या लांबच लांब रांगा दिसत असल्याने प्रकल्पाची क्षमता आणि त्यात प्रत्यक्षात किती सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जाते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शिरवडे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून दूषित पाणी थेट साळ नदीच्या दिशेने वाहत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. हा प्रकार गंभीर असून, त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्यावरणीय निकषांनुसार प्रक्रिया केली जाते की नाही, याची प्रयोगशाळेत...