

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
म्हापसा येथील सेंट मेरी प्राथमिक शाळेजवळ सुरू असलेल्या एका खासगी बांधकाम प्रकल्पाला योग्य रस्त्याची सोय नसल्याचा आरोप पालकांनी केल्यानंतर, म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाळेजवळील रस्ता आणि परिसराची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
या पाहणीदरम्यान पालिका अभियंत्यांनी संबंधित रस्त्याची रुंदी मोजून सविस्तर तपासणी केली. यावेळी शिक्षक-पालक संघाचे सदस्य, शाळा व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, संबंधित बांधकाम व्यवसायिक आणि अॅड. शशांक नार्वेकर उपस्थित होते. या पाहणीचा सविस्तर अहवाल लवकरच पालिकेचे मुख्याधिकारी कौशिक देसाई यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
शाळेच्या पीटीए सदस्यांनी म्हापसा पालिकेवर दोन दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. पालिका आणि शाळा यांच्यातील बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला खरेदीखत करार पूर्ण करावा तसेच या खासगी बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन देत संबंधित घटकांना नोटिसा बजावल्या होत्या.
पीटीए अध्यक्ष गॅब्रिएल परेरा म्हणाले की, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली असून आम्ही त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहोत. अहवाल आल्यानंतरच आम्ही पुढचे पाऊल उचलू, लवकरात लवकर मिटावा, हीच आमची मुख्य अपेक्षा आहे.
दुसरीकडे सदर इमारतीचे बांधकाम व्यवसायिक मारिओ फर्नांडिस यांनी पालकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या मंजूर आराखड्यात रस्त्याची स्पष्ट तरतूद आहे. प्रत्यक्षात शाळेची संरक्षक भिंत बेकायदेशीर असून त्यासाठी पालिका किंवा उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाची (एनजीपीडीए) परवानगी घेतलेली नाही. या भिंतीमुळेच रस्ता अरुंद झाला आहे असा आरोप फर्नांडिस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मुलांच्या शिक्षण महत्त्वाचे
उपसभापती तथा म्हापसाचे स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी प्रतिक्रिया दिली. हा विषय तांत्रिक आणि कायदेशीर बाबींशी संबंधित असून, संबंधित विभागाकडून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कायद्यानुसार रीतसर सव्र्व्हे केला जाईल, या प्रकरणात कोणालाही वाद नको आहे. मुलांचे शिक्षण सर्वात महत्त्वाचे असून सेंट मेरी ही भागातील अत्यंत जुनी आणि नामांकित संस्था आहे. तसेच मागील २० वर्षे कोणीही या विषयाचा पाठपुरावा केला नव्हता, मात्र आता आम्ही प्रलंबित खरेदीखताची प्रक्रिया सुरू केली आहे.