Goa Mapusa constituency|म्हापसा मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस

भाजपसह काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढली; नव्या राजकीय समीकरणांची शक्यता
Goa Mapusa constituency
Goa Mapusa constituency
Published on: 
Updated on: 

म्हापसा : म्हापसा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यापूर्वी तो मगोचा बालेकिल्ला होता. माजी उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा आणि त्यांचे सुपुत्र, विद्यमान आमदार तथा सभापती जोशुआ डिसोझा यांच्या माध्यमातून भाजपने येथे अडीच दशके वर्चस्व कायम राखले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे.

विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा भाजपकडून पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. म्हापसा शहरातील विकासकामांवरून विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप होत आहेत. तसेच पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, असा विश्वास आहे.

यावेळी पक्षांतर्गतच त्यांच्या उमेदवारीसमोर आव्हान उभे राहिले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सीमाशुल्क अधिकारी मयूर सावकार यांनी म्हापशातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, भाजपच्या तिकिटावर दावा केला आहे. तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणूनही रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यांना भाजपमधील काही नेत्यांचे छुपे समर्थन असल्याची चर्चा आहे.

दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जनतेच्या नजरेत येण्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले आहे. त्यांच्या संस्थेच्या आनंद निकेतनमध्ये भाजपच्या केंद्रीय प्रभारींना निमंत्रित केल्याने उमेदवारीच्या दृष्टीने त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. म्हापसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संदीप फळारी यांनीही भाजपच्या उमेदवारीवर दावा केला असून, समाजमाध्यमांद्वारे ते सक्रिय झाले आहेत.

माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी भाजपमध्ये घरवापसी केल्यास त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते सध्या काँग्रेसमध्ये असले तरी भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास यावेळी ते निश्चित निवडून येतील, असे एका माजी नगराध्यक्षाने म्हापशातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दुसरीकडे, काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांना तिसऱ्यांदा काँग्रेसची उमेदवारी मिळेल की नाही, याची शाश्वती नसली तरी त्यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असे गृहीत धरून प्रचाराला सुरुवात केली आहे. मागील दोन निवडणुकांत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विजय मिके यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी दावा केला आहे. म्हापसा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर हेही म्हापसा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हापशातून उमेदवारी न मिळाल्यास थिवी मतदारसंघातून दावा करण्याची त्यांची तयारी असल्याची चर्चा आहे.

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांच्या नावाचीही काँग्रेसमध्ये चर्चा आहे. पक्षाने महिलांना उमेदवारी देण्याचे ठरवल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, त्या मांद्रे मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आपचे माजी संयोजक राहुल महांबरे आणि काँग्रेसचे उत्तर गोवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

गणेशोत्सव काळात नागरिकांना दहा रुपयांत पाच नारळ देणारे तसेच झाडांचे वाटप करून समाजसेवा करणारे योगेश केळकर हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. कोणताही गाजावाजा न करता ते समाजसेवा करत आहेत. दीपावलीनिमित्त त्यांनी मतदारसंघातील सुमारे ६०० घरांना भेटवस्तू देऊन आपले अस्तित्व दाखवून दिले. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. शिवसेना (उबाठा) चे राज्यप्रमुख जितेश कामत यांनीही म्हापशातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रिव्होल्यूशनरी गोवन्स आणि गोवा फॉरवर्ड यांच्याकडून अद्याप हालचाल दिसत नसली तरी त्यांचेही उमेदवार रिंगणात उतरू शकतात.

Goa Mapusa constituency
Goa Anjuna Salaulim Modernization Proposal | अंजुणे, साळावलीच्या आधुनिकीकरणासाठी हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव : मंत्री शिरोडकर

गतवेळी डिसोझा-कांदोळकर यांच्यात थेट लढत...

मागील दोन विधानसभा निवडणुकांत विद्यमान आमदार जोशुवा डिसोझा आणि माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्यात थेट लढत झाली होती. आगामी निवडणुकीतही हीच लढत पुन्हा पाहायला मिळते की नव्या राजकीय समीकरणांमुळे म्हापशातील निवडणुकीचे चित्र बदलते, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Goa Mapusa constituency
Goa Anjuna Salaulim Modernization Proposal | अंजुणे, साळावलीच्या आधुनिकीकरणासाठी हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव : मंत्री शिरोडकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.