

डिचोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमातील विचार, प्रेरणादायी कथा आणि विविध उपक्रम आता पुस्तकाच्या रूपात वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. या पुस्तकाच्या मराठी आणि कोकणी आवृत्त्याही उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
'मन की बात' हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून तो संपूर्ण देशाचा कार्यक्रम असल्याचे सावंत यांनी सांगितले. देशाच्या विविध भागांतील सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कथा, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि उल्लेखनीय कामगिरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशासमोर येतात, असे त्यांनी नमूद केले.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील घडामोडींबाबत जनजागृती करण्यामध्ये 'मन की बात'चे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विविध वयोगटांतील नागरिकांना या कार्यक्रमातून सकारात्मक प्रेरणा आणि अनेक उपयुक्त धडे मिळतात आतापर्यंत 'मन की बात'चे १३९ भाग प्रसारित झाले आहेत. देशाच्या दुर्गम भागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, तसेच विविध समुदायांच्या उपक्रमांनाही या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डिचोली येथील दीनदयाळ सभागृहात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'च्या १३९ व्या भागाच्या प्रसारणानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. यावेळी भाजपच्या राज्य प्रभारी भारती पवार, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, खासदार सदानंद शेट तानावडे, मंडळ अध्यक्ष कौस्तुभ पाटणेकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, वल्लभ साळकर, भाजपच्या किसान मोर्चा, ओबीसी मोर्चा आणि एसटी मोर्चाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर 'मन की बात' कार्यक्रमाचे शंभर टक्के यशस्वी आयोजन झाल्याचे सांगितले.
बारा वर्षांपासून ऐकतोय मन की बात...
गेल्या १२ वर्षांपासून आपण नियमितपणे 'मन की बात' ऐकत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आता या कार्यक्रमातील आशय पुस्तकांच्या माध्यमातून संकलित होत असल्याने वाचकांना यातील विचार, कथा आणि प्रेरणादायी अनुभव पुन्हा वाचण्याची संधी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.