

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दीड वर्षापूर्वी मांडवी पुलावर झालेल्या भीषण वाहन अपघात प्रकरणी उत्तर गोवा सत्र न्यायालयाने मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालक संकेत शेट याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चितीचा आदेश दिला आहे.
या अपघातात दोघा निष्पाप मजुरांचा मृत्यू झाला होता. या अपघातात पुलावर काम करणारे मजूर अमित आणि धीरज हे कार आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली जेट पॅचियर मशीन यांच्यात चिरडले जाऊन ठार झाले होते. या अपघातप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक संकेत शेट याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीवेळी तो मद्याच्या नशेत होता. त्याच्या निष्काळजीपणामुळे या मजुरांचा जीव गेला होता.
त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी होऊन आरोपी निश्चितीचा आदेश देऊन न्यायालयाने खटल्यावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. न्यायालयाने, संबंधित परिसरात ३० किमी प्रतितास वेगमर्यादा असताना आरोपीने बेदरकारपणे उच्च वेगाने वाहन चालवले होते. तसेच तो नशेत होता, हे सिद्ध झाले आहे असे म्हटले आहे.