

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील रस्त्यांवर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. रस्त्यांवर बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक खात्याने सांगितले मुंबई गोवा महामार्गावर ९२, तर दक्षिणेत वेर्णा परिसरात १० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.
स्मार्ट सिटीमध्ये १४ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मेरशी येथील जंक्शनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही त्यात समावेश आहे. साहाय्यक वाहतूक संचालकांनी ही माहिती दिली. रस्त्यावरील अपघातांची संख्या राज्यात मोठी आहे. रस्ते अपघातात वर्षाला ३०० च्या आसपास बळी जातात.
अनेकदा भरधाव वेग, हेल्मेट न घालणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, सिग्नल तोडून जाणे, वाहन चालवताना मोवाईल वर बोलणे, अशी कारणे असतात. प्रत्येक रस्त्यावर वाहतूक नियमभंगाचे प्रकार घडत असून दिवसेंदिवस अपघातांची संख्या चाढते आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी आणि त्यातून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस आणि वाहतूक विभाग लक्ष ठेवणार आहे.
सीसीटीव्ही कधी सुरू, कधी बंद
काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कधी बंद, तर कधी सुरू असतात. सध्या काही ठिकाणी कॅमेरे अजून बसवायचे आहेत. तर काही ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे तूर्त तरी वाहतूक व्यवस्था राम भरोसे आहे.
पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पर्वरीत सीसीटीव्ही
राष्ट्रीय महामार्गावर पर्वरी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे तीन ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्याठिकाणी वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करत आहेत. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर तिथे सीसीटीव्ही कार्यान्वित केले जातील, अशी माहिती वाहतूक संचालक लाडू गावकर यांनी दिली.