

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबच्या अग्निकांड घटनेनंतर थायलंडला पलायन केलेल्या क्लबचे मालक सौरभ लुथरा व गौरव लुथरा या बंधूंना १० दिवसांनंतर भारतात आणण्यात आले आहे. दिल्ली येथे तैनात असलेल्या गोव्याच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
दिल्लीत सर्व काही कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्या दोघांना बुधवारी पहाटेपर्यंत (दि. १७) गोव्यात आणले जाणार आहे. गोव्यात त्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार असून, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंटरपोलने बंधूंना लुथरा दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणल्यावर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पटियाळा हाऊस न्यायालयात उभे करून गोव्यात आणण्यासाठी ट्रान्झिट कस्टडी मागण्यात आली. त्यानंतर ती मान्य करण्यात आली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गोव्यातून आलेल्या विशेष पोलिस पथकाकडे त्यांना सोपविण्यात आले.
गोवा पोलिस पथक बुधवारी पहाटेपर्यंत गोव्यात पोहचणार आहे. त्यासाठी मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांना विमानतळावरून थेट हणजूण पोलिस स्थानकात नेण्यात येईल व त्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणी करून कोठडी घेण्यासाठी म्हापसा न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्राने दिली. त्यांची पोलिस कोठडीतील चौकशीव्यतिरिक्त सत्यशोधन चाचणी (लाय डिटेक्टर टेस्ट) तसेच पोलिग्राफ चाचणीही केली जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीला गेलेल्या पथकात डिचोली उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीदेवी बी. व्ही., पर्वरी पोलिस निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक मंदार परब तसेच हणजूण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक साहिल वारंग यांचा समावेश आहे. याशिवाय अतिरिक्त पोलिस कर्मचारीही पाठविण्यात आले आहेत. सदोषमनुष्य वध व निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद केलेल्या नऊजणांपैकी सहाजण पोलिस कोठडीत आहेत. लुथरा बंधू यांचा दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असल्याने त्यांना गोव्यातील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.
जळालेल्या नाईट क्लबचे बांधकाम सुरिंदर कुमार खोसला यांनी केले होते. हे बांधकाम बेकायेदशीर ठरवून ते पाडण्याचे आदेश पंचायतीने दिले होते. त्यानंतर कारवाई करण्याऐवजी त्याला पंचायत संचालकांकडून स्थगिती मिळवण्यात आली. या नाईट क्लबच्या जागेच्या कराराची बोगस प्रत तयार करून लुथरा बंधूंनी व्यवसायासाठी लागणारे विविध परवाने घेतल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
त्यामुळे त्यांना परवाने देणारे अधिकारीही अडचणीत येणार आहेत. त्यांच्या जबान्या नोंद केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हणजूण पोलिसांनी ५० हून अधिकजणांच्या जबान्या नोंदवल्या आहेत. लुथरा बंधूंच्या अटकेनंतर आता अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.