

मडगाव : रविना कुरतरकर
लहान मुलांच्या निरागस हौसेतून सुरू झालेली गणेशपूजेची परंपरा आज श्रद्धेचे मोठे केंद्र बनली आहे. सुमारे सहा दशकांपूर्वी कोंब वाड्यावर काही मुलांनी खेळता खेळता केलेल्या गणपती पूजनाला पुढे धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.
चतुर्थीच्या दहाव्या दिवशी पूजन आणि अकराव्या दिवशी विसर्जन अशी अनोखी परंपरा आजही अखंड सुरू असून, नवसाला पावणारा 'राखणेचा गणपती' म्हणून कोंब-मडगाव परिसरात या बाप्पाची विशेष ओळख निर्माण झाली आहे. वार्षिक पद्धतीनुसार बुधवारी हा गणपती पूजण्यात आला असून गुरुवारी मोठ्या धुमधडाक्यात याचे विसर्जन होणार आहे.
कोंब मडगाव येथील 'सकल्लो वाडो' म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी यंदाही मोठ्या भक्तिभावात राखणेच्या गणपतीचे पूजन करण्यात आले. सोमवारी दहाव्या दिवशी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना ते उत्तरपूजापर्यंतचे धार्मिक विधी गोपाळ दामोदर राणे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सुमारे ५०० भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. कोंब वाड्यातील ज्येष्ठ स्थानिकांच्या माहितीनुसार, सुमारे ६० वर्षांपूर्वी काही लहान मुले खेळता खेळता घरातिल छोटी गणपतीची मूर्ती आणून तिचे धार्मिक पद्धतीने पूजन केले.
दहाव्या दिवशी पूजा करून अकराव्या दिवशी तिचे विसर्जन करण्यात आले. पुढील वर्षी मुलांनी नवीन व मोठी मूर्ती आणून ही परंपरा कायम ठेवली. अशा प्रकारे मुलांच्या हौसेतून सुरू झालेली ही पूजा वर्षानुवर्षे सुरू राहिली.
भाविकांकडून दानाचा ओघ
एका वर्षी मुसळधार पावसामुळे अंगणात गणपतीची पूजा करणे शक्य झाले नाही. त्यावेळी देवाचा प्रसाद घेऊन मूर्ती घरात पूजनाची व्यवस्था करण्यात आली. कालांतराने या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली.
परिसरातील नागरिक नवस करू लागले आणि नवस पूर्ण झाल्यानंतर आपल्या श्रद्धानुसार दान देऊ लागले. महाभोजनासाठी मोठी भांडी, पाच-दहा किलो कडधान्ये, रोख रक्कम, सोन्याचा कडा, सोन्याची अंगठी अशा स्वरूपात भाविकांनी अर्पण केले.
यंदाही मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गणपती पूजनानंतर सत्यनारायणाची पूजाही करण्यात आली. संध्याकाळी महिला व पुरुषांनी पारंपरिक कोकणी गीतांवर फुगड्या खेळल्या.
सुमारे चार तास रंगलेल्या या फुगड्यांनंतर आरतीच्या वेळी विशेष पंगतीचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी रात्री महाप्रसादानंतर राखणेच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून, कोंब-मडगाववासियांनी यंदाही श्रद्धा आणि परंपरेचा हा वारसा जपला आहे.