

मडगाव पुढारी वृत्तसेवा
नावेली-फर्स्ट दांडो येथील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल पळवला. ही घटना नाताळच्या पूर्वसंध्येला नॅन्सी फर्नांडिस यांच्या घरी घडली, जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेली येथील फर्स्ट दांडो परिसरात राहणाऱ्या नॅन्सी फर्नांडिस यांच्या कुटुंबातील मंडळी २४ डिसेंबर रोजी रात्री नाताळनिमित्त प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेली होती. घरात कुणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाची कड़ी तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने, परदेशी चलन, घड्याळ व इतर वस्तू असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची घटना लक्षात येताच फर्नांडिस कुटुंबीयांनी मडगाव पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करत पंचनामा केला. चोरीची ही संपूर्ण घटना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती, मात्र चोरट्याने जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरून नेला.
चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला होता आणि त्याच बाजूला असलेल्या शेतातून ते पसार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मडगाव पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करत असून लवकरच चोरट्यांना पकडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.