

• मडगावातील खूनप्रकरणानंतर सुन्नी गुलिस्तान मशीद ४८ तासांसाठी बंद करण्यात आली.
• उपाध्यक्ष अली खान यांच्यावर नमाजानंतर चाकूहल्ला होऊन मृत्यू झाला.
• या प्रकरणात चार संशयितांना अटक करण्यात आली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
• तक्रारदार व साक्षीदारांना धमकीचे संदेश मिळाल्याने पोलिस तपास अधिक तीव्र झाला आहे.
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
घोगळ हाऊसिंग बोर्ड परिसरातील सुन्नी गुलिस्तान मशीद दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांच्या उपस्थितीत सील करण्यात आली. मशिदीबाहेर खुनाची घटना घडली असून तिचा तपास सुरू असल्याने, शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मशीद दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, यातील संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे सुन्नी गुलिस्तान मशिदीबाहेर अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शांतता राखण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने ही मशीद पुढील ४८ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला.
सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोणालाही मशीद परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल. केवळ फातोर्डा पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीनेच प्रवेश दिला जाईल. दोन दिवसांनंतर स्थानिक पोलिसांच्या अहवालाच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
परिसरात चोख बंदोबस्त
मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्यावर नमाजानंतर चाकू हल्ला झाला होता. यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात अद्याप तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, मशीद परिसर व रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
चारजणांना अटक, आणखी काहीजण रडारवर
मशिदीचे उपाध्यक्ष अली कलंदर खान (वय ४०) यांच्या खून प्रकरणी दक्षिण गोवा पोलिसांनी तत्काळ अक्रम खान (४५) व उबेद मकानदार (३८) या दोघांना अटक केली. त्यानंतर सायंकाळी संशयित आलम सय्यद व लतिफ सय्यद यांनाही ताब्यात घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातही एका संशयितावर जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिस व सुरक्षारक्षकांनी त्याला वाचवले. या प्रकरणी आणखी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.
संशयिताची पोलिस कोठडीतून धमकी
घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील अली खान खूनप्रकरणातील तक्रारदारांना संशयिताकडून धमकीचे संदेश आले आहेत. संशयित पोलिस कोठडीत असताना त्याच्या मोबाईलवरून धमकीचे संदेश कसे येतात? अशी विचारणा करत तक्रारदारांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. घोगळ हाउसिंग बोर्ड येथील खून प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. असे असतानाही, या प्रकरणातील तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार सुरूच आहेत.
तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी खूनाची घटना घडल्यानंतर सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता, तिथे उपस्थित संशयितांनी पुढचा नंबर तुमचा असेल, अशी धमकी पोलिसांसमोरच दिली होती. त्यावेळीही पोलिसांना याबाबत कल्पना देण्यात आली होती. शनिवारी सकाळी ७.५७वाजता संशयिताच्या मोबाईलवरून तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकीचा संदेश आला.
माझ्या साथीदारांना काही त्रास दिल्यास मी जास्त काळ कोठडीत राहणार नाही. बाहेर पडल्यावर तुम्हा सर्वांना बघून घेईन, असा मजकूर या संदेशात होता. या संदेशाचा स्क्रीनशॉट घेऊन तक्रारदारांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. यावर अधीक्षकांनी सांगितले की, ही घटना घडली तेव्हा जे कुणी ड्यूटीवर होते त्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि उर्वरित संशयितांना पुढील ४८ तासांत अटक केली जाईल.