

गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत 25 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मोठी कारवाई करत क्लबचे मुख्य मालक असलेले सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना थायलंडमधून भारतात डिपोर्ट करण्यात आले आहे. दोघेही आता भारतात परतले असून त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. क्लबमध्ये सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. आग लागल्यानंतर गोवा पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी बचावकार्य करत असतानाच, लुथरा बंधूंनी 6 आणि 7 डिसेंबरच्या मध्यरात्री थायलंडमधील फुकेतसाठी तिकीट बुक करून देशातून पलायन केल्याची माहिती तपासात समोर आली होती.
गोवा पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. क्लबच्या व्यवस्थापनासह अनेक जणांना अटक करण्यात आली. याच दरम्यान, लुथरा बंधूंविरोधात लूकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले. त्यांच्या पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती.
11 डिसेंबर रोजी भारत सरकारच्या विनंतीवरून थायलंड प्रशासनाने फुकेत येथील एका हॉटेलमधून सौरभ आणि गौरव लुथरा यांना ताब्यात घेतले. त्या वेळी ते सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्याची माहितीही समोर आली होती. परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि गोवा पोलिसांच्या समन्वयातून ही कारवाई पार पडली.
त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांना भारतात डिपोर्ट करण्यात आले. आता तपास यंत्रणा त्यांना न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मागणार आहे, जेणेकरून पुढील तपास गोव्यात करता येईल.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तपास जलदगतीने सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी हा तपास निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले असून, येत्या काळात न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर येईल, अशी माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे.