

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
सध्या भाजपचे वर्चस्व असलेला कळंगुट मतदार संघ एकेकाळी काँग्रेस पक्षाचे बलस्थान म्हणून ओळखला जात होता. कळंगुटचे विद्यमान आमदार मायकल लोबो यांच्या निवडीनंतर भाजपने या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे.
असे असले तरी विरोधकांकडून संघटितपणे शक्ती प्रदर्शित झाल्यास भाजपच्या उमेदवाराला नामोहरम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते कळंगुट जिल्हा पंचायत निवडणुकीत चौरंगी लढत होणार असली तरी खरी लढत भाजप व काँग्रेस अशीच दिसून येत आहे.
या मतदारसंघात कॉंग्रेस पक्षातर्फे कार्मेलिन फर्नांडिस, भारतीय जनता पक्षाच्या फ्रेंडीला रॉड्रिग्ज, आरजीच्या अनन्या कांदोळकर व आप पक्षाच्या कॅरोल फर्नांडिस या निवडणूक रिंगणात आहेत. यंदा हा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाल्यामुळे गेल्या दोन वेळेस विरोधी उमेदवारावर सहज मात करून विजयी झालेले भाजपचे दत्तप्रसाद दाभोळकर यांची हॅट्रिक करण्याची संधी हुकली आहे.
कळंगुट नागवा हडफडे व कांदोळी या तीन पंचायती जोडून तयार करण्यात आलेला हा कळंगुट मतदार संघ आहे. या मतदारसंघात एकूण २२,११७मतदारांची नोंद झाली आहे. यात १०, ७८१ पुरुष मतदार तर ११,३३६ महिला मतदारांचा त्यात समावेश आहे. या तीनही पंचायतीवर सध्या विद्यमान आमदार मायकल लोबो यांचे वर्चस्व आहे, त्यामुळे विद्यमान निवडणूक भाजपला सहज विजयी मिळवून देणार, असे वाटत असले तरी त्यांच्या विरोधातील वाताबरण त्यांना महाग पडू शकते.
जिल्हा पंचायत निवडणुकीकरिता भाजपाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या जाहीर सभांचे आयोजन कांदोळी येथे केले; परंतु काँग्रेस, आप किंवा आरजी कडून कोणत्याही मोठ्या सभेचे आयोजन अद्याप झालेले नाही. भाजपच्या उमेदवार फ्रेंडीला रॉड्रिग्स यांच्या प्रचाराकरिता आमदार मायकल लोबो जातीने घरोघरी फिरत आहेत.
अनेक समस्या, मुद्दे ऐरणीवर मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी, वाढते गैरप्रकार, अमली पदार्थाचा मुद्दा, कचरा, पार्किंग समस्या आदी विषय या निवडणुकीत महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर गेल्या निवडणुकीत कळंगुट पंचायतीचे विद्यमान सरपंच जोसेफ सिक्वेरा हे आमदार मायकल लोबो यांच्या विरोधात होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक ही लढवली होती, त्यामुळे ते भाजपच्या बाजूने राहण्याची शक्यता आहे.
माजी सरपंच, माजी आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष
दोन वेळा कळंगुटचे आमदार राहिलेले माजी आमदार आझेल फर्नांडिस यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले असले तरी त्यांची भूमिका काही प्रमाणात निर्णायक ठरू शकते. मागच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले माजी सरपंच अँथनी मिनेझिस या जिल्हा पंचायत निवडणुकीत कोणती भूमिका घेतात हे पाहणे उचित ठरेल.