IFFI Goa 2026: "विनोद हा आयुष्याकडे पाहण्याचा बुद्धिमान मार्ग"; स्पेनच्या ‘लुकिंग फॉर मायकल’चा इफ्फी ५७ मध्ये वर्ल्ड प्रीमियर

पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज स्पेनच्या ‘लुकिंग फॉर मायकल’ (पर्सिग्युएंडो अ मायकल) या २०२६ च्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला.
Looking for Michael Movie
पणजी : ‘लुकिंग फॉर मायकल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जुआना माशियास यांना सन्मानित करण्यात आले.File Photo
Published on: 
Updated on: 

IFFI Goa 2026

पणजी : भारत शिंदे

विनोद हा आयुष्याकडे पाहण्याचा बुद्धिमान मार्ग आहे. प्रत्येकालाच कधी ना कधी अडचणींना सामोरे जावे लागते. मग ते आजारपणातून असो, खोल दुःखातून असो किंवा इतर अनपेक्षित आव्हानांतून असो. या सार्वत्रिकतेमुळेच चित्रपटाला व्यापक अपील मिळते. त्याचा मध्यवर्ती संदेश ५७ व्या इफ्फीच्या संकल्पनेप्रमाणे सीमा आणि पिढ्या ओलांडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, असे मत स्पेनच्या ‘लुकिंग फॉर मायकल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शिका जुआना माशियास यांनी व्यक्त केले.

आयुष्यातील अडचणींना हसून सामोरे गेलो तर काय होते? स्पेनच्या ‘लुकिंग फॉर मायकल’ (पर्सिग्युएंडो अ मायकल) या २०२६ च्या कॉमेडी-ड्रामा चित्रपटातून या प्रश्नाचा वेध घेतला आहे. जुआना माशियास दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य, मैत्री आणि जिद्दीची हृदयस्पर्शी कथा आहे. पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

Looking for Michael Movie
IFFI Goa 2026: एआयचा वाढता वापर चिंताजनक : इफ्फीमध्ये फ्रेंच चित्रपट निर्मात्या ज्युली बर्तुचेली यांचा इशारा

हा चित्रपट सोनियाची कथा सांगतो. सोनिया ही पार्किन्सन्स आजाराचे निदान झालेली तरुण महिला आहे. ती आपल्या परिस्थितीला धैर्याने आणि आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून सामोरे जाण्याचा निर्णय घेते. आपल्याचप्रमाणे या आजारासोबत जगणाऱ्या म्युझिक थेरपी ग्रुपच्या सदस्यांच्या साथीने ती प्रसिद्ध अभिनेते मायकल जे. फॉक्स यांना भेटण्यासाठी प्रवासाला निघते. फॉक्स यांनी पार्किन्सन्ससोबत जगण्याबद्दल जाहीरपणे बोलले आहे. संगीत आणि विनोद यांचा मिलाफ असलेला हा रोड फिल्म प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या अटींवर आयुष्य जगण्याची जिद्द दाखवतो.

हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील महिला येस अँड्रेझ यांच्या प्रवास आणि स्वप्नातून प्रेरित आहे. येस यांना त्यांच्या तिशीच्या मध्यात पार्किन्सन्सचे निदान झाले होते. त्यांच्या अनुभवांमधून चित्रपटाला उब आणि सत्यता मिळते. रोजच्या आयुष्याचे बारकाईने निरीक्षण केल्यामुळे कथानकाला भावनिक प्रामाणिकपणा लाभतो आणि पात्रांची आव्हाने व आकांक्षा पडद्यावर येतात.

चित्रपटातील संगीताच्या भूमिकेबद्दल बोलताना माशियास यांनी स्पष्ट केले की, गाणी सोनियाच्या तिच्या आजारासोबतच्या बदलत्या नात्याचे प्रतिबिंब पाडतात आणि पात्रांच्या भावना व अनुभवांशी घट्ट विणलेली आहेत. स्पॅनिश चित्रपट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी कसे जोडले जाऊ शकतात, या प्रश्नाला उत्तर देताना माशियास म्हणाल्या की, संगीत आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या कथांना सार्वत्रिक अपील आहे. व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पॅनिश आणि आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत सहयोग करण्याच्या योजनांबद्दलही त्यांनी सांगितले. या सत्राचे सूत्रसंचालन कुलदीप मीणा यांनी केले.

Looking for Michael Movie
IFFI 2026 Girish Kasaravalli | चित्रपट कधीच अराजकीय नसतो! इफ्फीमध्ये गिरीश कासारवल्ली यांनी मांडली महत्त्वाची भूमिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.