

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
एकेकाळी खळखळून वाहणारी, स्वच्छ पाण्याने लासलगावच्या सौंदर्यात भर घालणारी शिवनदी आज सांडपाण्याच्या नाल्यामध्ये रूपांतरित झाली आहे. नदीपात्रातील अतिक्रमण, सर्रास टाकला जाणारा कचरा, गावातील सांडपाण्याचा प्रवाह आणि वाढलेल्या पाणवेली यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
यंदा पावसाअभावी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह अत्यल्प राहिल्यामुळे सांडपाणी ठिकठिकाणी साचून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, दसरा - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
जुन्या जाणकारांच्या आठवणीत शिवनदीचे रूप आजही जिवंत आहे. मोठ्या पात्रातून स्वच्छ पाणी वाहणारी नदी परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याचा अविभाज्य भाग होती. मात्र, गेल्या काही वर्षांत नदीपात्रात झालेल्या अतिक्रमाणामुळे तिचा नैसर्गिक प्रवाह अरुंद झाला. त्यातच नदीपात्रात आणि काठावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.
आज नदी वाचवली नाही, तर उद्या 'शिवनदी' ही केवळ लासलगावच्या जुन्या आठवणींत आणि कागदोपत्री नकाशावरच उरेल. प्रशासन, ग्रामपंचायत, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यासच पुन्हा एकदा शिवनदीला तिचे हरवलेले रूप मिळू शकते.
नदी की, कचराकुंडी?:
नदीपात्रात प्लास्टिक, घरगुती कचरा, घरामध्ये नको असलेला टाकाऊ कचरा, व्यावसायिक आस्थापनांमधील कचरा तसेच बांधकाम साहित्य टाकले जात असल्याचे चित्र आहे. कचरा उचलण्याची आणि टाकणाऱ्यांवर कारवाईची यंत्रणा कुठे आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी झालेल्या अतिक्रमाणामुळे पाण्याच्या नैसर्गिक मार्गही बाधित झाला आहे.
सांडपाण्याचे 'डबके':
यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल राहिल्यामुळे नदीला अपेक्षित पाणी आले नाही. परिणामी, गावातून वाहून येणारे सांडपाणी नदीपात्रातच साचून राहत आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नसल्यामुळे दुर्गंधी वाढली असून, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि जलवनस्पतींची वाढ झाली आहे. साचलेल्या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून, नदीकाठच्या रहिवाशांच्या आरोग्याबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
'जबाबदार कोण?' हा प्रश्न:
शिवनदीची ही अवस्था केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाली की, नागरिक आणि व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे, हा प्रश्न चर्चेत आहे. नदीत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, अतिक्रमण हटविणे, सांडपाण्याचा नदीत होणारा प्रवाह रोखणे, पाणवेली व गाळ काढणे आणि नदीपात्राची नियमित स्वच्छता करणे, या उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे.
'शिवनदी संवर्धन' कागदावरच?:
शिवनदी संवर्धनासाठी प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कामाला अद्याप अपेक्षित गती आलेली नाही. त्यामुळे मंजूर प्रकल्प प्रत्यक्षात कधी उतरणार, नदीपात्रातील अतिक्रमणे कधी हटणार आणि सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.