

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
कुशावती जिल्ह्यातील एका नगरसेवकाच्या पुत्राने १६ पेक्षा अधिक मुलींशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे अश्लील व्हिडीओ मित्रांमध्ये व्हायरल केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. या सेक्स स्कँडलमधील बहुतांश मुली १४ ते १७ वयोगटातील आहेत. मुलींचे अश्लील व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होऊ लागल्याने बऱ्याच जणींनी शाळेत जाणे बंद केले आहे.
पालक मात्र बदनामीच्या भीतीने मूग गिळून बसले आहेत. तक्रार देण्यास कोणीच पुढे येत नसल्यामुळे पोलिसांचेही हात बांधले गेले आहेत. अल्पवयीन मुलींच्या भोळेपणाचा फायदा उठवून त्यांच्याशी जवळीक साधत आपल्या प्रेमपाशात अडकवणाऱ्या या युवकाचे पराक्रम कुशावती जिल्ह्यातील कित्येक अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरले आहेत.
प्राप्त माहितीप्रमाणे बऱ्याच मुलींना आपले व्हिडीओ काढले गेलेत याची पुसटशी देखील कल्पना नाही. त्या व्हिडीओच्या बदल्यात पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या त्या नराधमाच्या ब्लॅकमेलिंगला या पीडित मुली बळी पडू लागल्या आहेत. शारीरिक संबंध ठेवतानाचे सेल्फी मोडमध्ये काढलेले ते व्हिडीओ त्यांच्या पालकांना पाठवून देण्याची धमकी देऊन वारंवार त्या मुलींचे लैंगिक शोषण केले जाऊ लागले आहे.
काही महिलांनाही त्याने आपल्या वासनेचे शिकार बनवले आहे. तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे समजते. दारू आणि ड्रग्सच्या पूर्ण आहारी गेलेल्या या नगरसेवकपुत्राने नशेत असताना आपल्याच मित्रांना ते व्हिडीओ दाखवल्यामुळे या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याला वाचा फुटली. काही मित्रांनी त्या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलींचे पासपोर्ट आकाराचे फोटो सदर व्हिडीओला लावून त्यांच्या इतर मित्रांमध्ये व्हायरल केले आहेत.
पीडितांची संख्या अधिक असण्याची भीती
लैंगिक अत्याचाराच्या बळींची संख्या १६ हून जास्त असल्याची माहिती खुद्द त्याच्या मित्रांनीच दिली आहे. प्राप्त माहितीप्रमाणे दोन मोबाईल फोन वापरत असलेल्या त्या युवकाने एक फोन खास अशा स्वरूपाचे व्हिडीओ तयार करण्यासाठी ठेवलेला आहे.