
म्हापसा : कोलवाळ येथील क्रीडा संकुलाच्या जागेत प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. क्रीडा मैदानाचीही जागा केवळ स्थानिक खेळाडू, क्रीडा स्पर्धांसाठी राखीव असावी, तिथे कोणत्याही प्रकारच्या इतर गोष्टी नकोत, असा आक्रमक पवित्रा घेत रहिवाशांनी मोबाईल टॉवरचे काम तातडीने बंद करण्याची मागणी केली.
कंपनीने गुरुवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू करताच या कामाला सरपंच रितेश वारखंडकर व ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. प्रशासनाकडून कामाला स्थगिती मिळत नसल्याचे पाहून सरपंच वारखंडकर व काही ग्रामस्थांनी थेट खोदलेल्या खड्ड्यात उतरून खोदकाम रोखून धरले. या प्रकल्पाला देण्यात आलेल्या सर्व परवानगीची तत्काळ उच्चस्तरीय फेरचौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मोबाईल टॉवर कंपनीच्या प्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोबाईल टॉवरचा मनुष्यावर कोणताही विपरित परिणाम होत नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, ग्रामस्थ एकूण घेण्यास तयार नसल्याचे पाहून आणि आंदोलनाची तीव्रता वाढल्याने पोलिस निरीक्षक संजित कांदोळकर व संयुक्त मामलेदार घटनास्थळी दाखल झाले.
टॉवरला नाही; पण जागेला आक्षेप
अधिकाऱ्यांनी सरपंच व आंदोलक ग्रामस्थांशी संवाद साधला व परिस्थिती नियंत्रणात आणली. आमचा टॉवरला विरोध नाही; पण या जागेला आक्षेप आहे. हा टॉवर इतरत्र स्थलांतर करावा. आमचा विरोध असताना सरकार हा टॉवर आमच्यावर लादू पाहत आहे, असे सरपंच रितेश वारखंडकर यांनी सांगितले.