

Goa nightclub fire 21 bodies transported
पणजी : गोव्यातील हडफडे परिसरातील बिर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला शनिवारी झालेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांपैकी २१ जणांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी झारखंड, उत्तराखंड, आसाम, पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथे पोहोचविण्यात आले आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी ही माहिती दिली.
सरकारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून मृतदेह वाहतुकीचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला असून, आतापर्यंत मृतदेह घरी पाठवण्यासाठी अंदाजे १२ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले. विशेष रुग्णवाहिकेतून हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुरक्षितरीत्या पोचवण्यात आले. यापैकी २० मृतांच्या नातेवाईकांनी गोव्यात येऊन मृतदेह स्वीकारले आणि सरकारने त्यांच्या वाहतुकीची जबाबदारी पार पाडली.
उर्वरित चार मृतांच्या बाबतीत कार्यवाही प्रलंबित आहे. नेपाळमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांकडून शवविच्छेदनासाठी आवश्यक एनओसी मिळण्याची प्रतीक्षा सुरू आहे. एनओसी मिळाल्यानंतरच त्यांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले जाणार आहेत.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ), बांबोळी येथील फॉरेन्सिक विभागातील मॉर्च्युरीत हे पाच मृतदेह ठेवण्यात आले आहेत. कागदपत्रांची पूर्तता आणि मृतदेह परत पाठविण्याच्या समन्वयाचे काम चार एजन्सींमार्फत केले जात असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच, नेपाळ दूतावासाकडूनही मृतदेह नेण्यासाठी मदत करण्याबाबत संपर्क करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.