

पणजी पुढारी वृत्तसेवा
करमळी येथे बेकायदेशीर पद्धतीने परवानगी दिलेला मेगा प्रकल्प थांबवण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही. जोवर नगर नियोजन खात्यातर्फे प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश येत नाहीत, तोवर आम्ही शांत बसणार नाही, अशा इशारा आमदार वीरेश बोरकर यांनी दिला.
आमदार बोरकर यांच्या नेतृत्वाखाली करमळी येथील नागरिक काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर नियोजन खात्यावर मोर्चा काढत सदर अवैध मेगा प्रकल्पाबाबत विचारणा करून काम थांबवण्याचे निर्देश काढण्याचा दबाव आणला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसहभाग दिसून आला.
बोरकर म्हणाले की, नगर नियोजन खात्यातील अधिकाऱ्यांसोबतच खात्याचे मंत्रीही भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ज्या प्रकल्पामुळे तेथील पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होईल, अशा प्रकल्पांना परवानगी दिलीच कशी जाते? संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली असता येथे अनेक अवैध बाबी असल्याचे त्यांनीही मान्य केले. प्रकल्प रद्द करण्यासाठी सरकारची परवानगी लागेल, असे त्यांनी नमूद केले.
प्रकल्पाला नोटीस :
मुख्यमंत्री आपण नगर आणि नियोजन मंत्र्यांशी या प्रकल्पाबाबत चर्चा केली असून आमदार वीरेश बोरकर यांनाही त्याची कल्पना दिली आहे. करमळी येथील संबंधित प्रकल्पाला नोटीस बजावली जाईल. पुढील तीन दिवसांत होणाऱ्या टीसीपी मंडळाच्या बैठकीत सदर प्रकल्पासाठी काम थांबवण्याचे आदेश जारी केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.