Karapur Sarvan Gram Sabha | परवानगी रद्द करा अन्यथा लढा चालूच, कारापूर सर्वण ग्रामसभेत मेगा प्रकल्पावरून खडाजंगी

Karapur Sarvan Gram Sabha | लोकप्रतिनिधींना खडेबोल : मेगा प्रकल्पावरून कारापूर सर्वण ग्रामसभेत खडाजंगी
Gram Panchayat
Gram PanchayatPudhari
Published on
Updated on

डिचोली : पुढारी वृत्तसेवा

मेगा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून रविवारी पुन्हा एकदा कारापूर सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेत जोरदार खडाजंगी झाली. जोपर्यंत या प्रकल्पाच्या सर्व परवानग्या अधिकृतपणे रद्द केल्या जात नाहीत, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयावर टाळाटाळ न करता आपली स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही करण्यात आली.

Gram Panchayat
Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!

मेगा प्रकल्पाला विरोध, कलम ३९-अ रद्द करणे, तसेच गावाचे नागरीकरण न करण्याच्या मागण्यांवरून ग्रामस्थ आणि सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अखेर या सर्व मागण्यांबाबत ग्रामस्थांनी मांडलेले ठराव उपस्थितीतांच्या टाळ्यांच्या कडकडाटात एकमुखाने मंजूर केले. सरपंच बिदिया सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला उपसरपंच बी. बी. आय. मागुड, तसेच सदस्य दिव्या नाईक, तन्वी सावंत, उज्ज्वला कवळेकर, लक्ष्मण गुरव, योगेश पेडणेकर आणि दामोदर गुरव उपस्थित होते.

मेगा प्रकल्पाचा विषय चर्चेला येताच वातावरण तापले. सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामसभेच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त होता. परंतु ग्रामस्थांनी अधिकच आक्रमक होत त्याला आक्षेप घेतला. सभेच्या सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी निर्माणाधिन गृह प्रकल्पाच्या परवानग्यांवरून स्थानिक पंचायतीला आणि प्रशासनाला धारेवर धरले.

कलम ३९-अ रद्द करण्यात यावे, गावाचे नागरीकरण होऊ नये आणि गावाचा पारंपरिक, ग्रामीण स्वरूप कायम ठेवावे, अशी मागणी केली. या मागण्यांसह मेगा प्रकल्पाला विरोध करणारे ठराव ग्रामस्थांनी सभेपुढे मांडले. उपस्थितीतांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात हे सर्व ठराव एकमुखाने मंजूर केले.

याशिवाय ग्रामसभेत गावातील प्रलंबित विकासकामे, कचरा व्यवस्थापन, मोकाट गुरांचा प्रश्न आदी विविध विषयांवरही चर्चा झाली. मयूर मोरजकर, विजय मटकर, गौरीश घाडी, नंदा सावळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित करून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

Gram Panchayat
Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!

नागरीकरणास चालना का?

आधीच ग्रामीण भागात पाणीटंचाई आणि विजेची अपुरी उपलब्धता यांसारख्या पायाभूत समस्यांना स्थानिकांना सामोरे जावे लागत असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरीकरणास चालना देणाऱ्या गृह प्रकल्पाला मंजुरी कशी देण्यात आली, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला. ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत गावाचे अस्तित्व आणि पर्यावरण धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली

... तर मुख्य रस्ता रोखून धरू

ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, वादग्रस्त मेगा प्रकल्पाचे काम तातडीने बंद करण्यात आले नाही, तर मुख्य रस्ता रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी अनेक ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात आपली भूमिका ठामपणे मांडली. 'कारापूर ग्रामस्थ एकजुटीचा आवाज' या बॅनरखाली एकवटलेल्या स्थानिक नागरिकांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनात गावातील तरुणाई आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news