

पणजी : आंतरराष्ट्रीय नदी दिनानिमित्त हेरिटेज फर्स्ट गोवा, हेरिटेज नेटवर्क, टी ट्रंक आणि आनी एक यांच्या सहकार्याने 'फ्रेंड्स ऑफ फिल्म : अवर व्हिर्स, अवर स्टोरीज' चित्रपट महोत्सव रविवार, दि. २७ रोजी गोवा मनोरंजन संस्थेच्या ऑडिटोरियम-१ मध्ये दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात गोव्याच्या नद्या, नदीकाठचे समाजजीवन आणि दैनंदिन जीवनातील विविध पैलू मांडणारे लघुपट व माहितीपट दाखवले जाणार आहेत. चित्रपट निर्मात्यांशी संवाद आणि विश्रांतीचे सत्रही आयोजित करण्यात आले आहे.
गोव्यात ११ प्रमुख नद्या तसेच शेकडो झरे, उपनद्या आणि लहान जलस्रोत आहेत. नद्यांची मुखे व खारफुटीची परिसंस्था मासे आणि अन्य समुद्री जिवांसाठी महत्त्वाची प्रजननस्थळे आहेत. त्यावर स्थानिक समुदायांची उपजीविका आणि गोव्याची खाद्यसंस्कृतीही अवलंबून आहे.
म्हादईसह राज्यातील नद्यांसमोरील प्रदूषण, पाणी वळवणे, वाढती क्षारता, समुद्री जिवांची घट, गाळ साचणे आणि वाहतुकीचा वाढता दबाव या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सव दोन विभागांत होणार आहे. 'अवर रिव्हर्स' विभागात स्थानिक चित्रपट निर्मात्यांनी नद्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या निवडक चित्रपटांचे प्रदर्शन होईल. या विभागाची सुरुवात कॅप्टन नितीन धोंड यांच्या चित्रपटाने होणार आहे. 'अवर स्टोरीज' विभागात वास्तविक घटनांवर आधारित निवडक काल्पनिक चित्रपट दाखवले जातील. या विभागाची सुरुवात प्रशांती तळपणकर यांच्या चित्रपटाने होईल.
नद्या म्हणजे शांत कथाकार : हेता पंडित
हेरिटेज फर्स्ट गोवाच्या संचालक हेता पंडित म्हणाल्या, आपल्या नद्या नेहमीच गोव्याच्या शांत कथाकार राहिल्या आहेत. व्यापार, स्थलांतर आणि दैनंदिन जीवनाच्या आठवणी त्या आपल्यासोबत घेऊन वाहतात. 'फ्रेंड्स ऑफ फिल्म'च्या माध्यमातून या कथा पडद्यावर येत आहेत. वारसा म्हणजे केवळ दगडांमध्ये जतन केलेल्या गोष्टी नव्हेत, तर लोक आणि निसर्गाच्या माध्यमातून पुढे सांगितल्या जाणाऱ्या कथाही त्याचा भाग आहेत.