

हणजूण : पुढारी वृत्तसेवा
हणजण कायसूव पंचायत क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला शेतजमिनीत मातीचा भराव टाकून तसेच काही ठिकाणी डोंगर कापणी करून आणि किनारी भागात बेकायदेशीर बांधकामांना ऊत आलेला आहे. न्यायालयाचा आदेश असतानाही व सरकारी यंत्रणांचे निर्देश असताना ते धुडकावून पंच सदस्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे केली जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्याच्या बाजूला तसेच शेतजमिनीत मातीचा भरव टाकणे गुन्हा असतानाही बऱ्याच ठिकाणी या शेतजमिनीत मातीचा भरव टाकण्याचे काम राजरोसपणे किंवा रात्रीच्या अंधारात केले जाते. त्यानंतर त्या ठिकाणी लोखंडी खांबांची दिखाव्यासाठी तात्पुरती अशी परंतु मजबूत बांधकामे केली जात आहेत.
किनारी भागात तर हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. समुद्र भरती रेषेचे उल्लंघन करून तर किनाऱ्यावरील डोंगर कापणी करून तात्पुरत्या बांधकामाचा परवाना मिळवून लोखंडाची मजबूत बांधकामे उभी राहत आहेत. हणजूण बागातोर किनाऱ्यावर अशी बांधकामे पाहावयास मिळत आहेत.
किनाऱ्यावरील समुद्र भरती रेषेचे उल्लंघन करून तसेच डोंगर कापणी करून अशा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेल्या बांधकामाबद्दल सर्व खात्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे तक्रारदार सांगतात. काही तक्रारींची दखल घेऊन पंचायतीतर्फे सर्वेक्षण केले जाते, पंचायत अशा बेकायदेशीर बांधकामांना डिमोलेशनची नोटीसही पाठवते; परंतु पंचायत संचालकांकडून झाला स्थगिती मिळवण्यास बांधकामकर्ते यशस्वी होतात.
क्लब तोडला जाईल की पुन्हा सुरू होईल ?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शेतजमिनीत बेकायदापणे बांधकाम केलेल्या गोया क्लबला डिमोलिशन नोटीस बजावण्यात आली. त्याला दोन महिने उलटून गेले; परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर कारवाई करण्यासाठी डिमोलेशन स्कॉड उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा क्लब तोडला जातो की पुन्हा सुरू होतो? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नोटीस बजावली; पण कारवाई नाही : गावकर
डोंगर कापणी केल्याची तसेच शेतजमिनीत भराव टाकल्याची तक्रार काही जणांकडून तलाठ्यांकडे केली जाते. तक्रारीच्या आधारे किंवा निदर्शनास आल्यानंतर तलाठ्यांकडून सर्वेक्षण केले जाते व त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जातो; परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. गेल्या वर्षभराच्या काळात आपल्या कार्यकालात आपण ४० ते ४५ अशा बेकायदेशीर कामांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल मामलेदार कार्यालयात पाठवून दिला आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही अहवालावर कारवाई झालेली नाही, फक्त शेत जमिनीत बांधकाम करण्यात आलेल्या गोया क्लब विरोधात बांधकाम पाडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे; परंतु अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही, अशी माहिती हणजूणचे तलाठी मुन्नेश गावकर यांनी दिली.