पणजी : पुढारी वृत्तसेवा
फर्मागुढी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठी कटमगाळ दादांच्या अगदी छोट्याशा मालमत्तेलाही कोणताही धक्का लागणार नाही. संपूर्ण आयआयटी प्रकल्प हा सरकारी जमिनीवरच उभारला जात असून, या प्रकल्पाला विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित आयआयटी प्रकल्प हा फर्मागुढी येथील कटमगाळ दादाच्या आवारात येत असल्याने तेथील स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. रविवारी या ग्रामस्थांनी तेथील देवस्थानला गाऱ्हाणे घातले होते.
त्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आयआयटी उभारणीबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने सर्व बाबींची प्रकल्पाच्या पडताळणी केली आहे.
प्रकल्पासाठी खासगी जमीन संपादित केली जाणार नसून, कटमगाळ दादांच्या मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही. केवळ विरोधासाठी म्हणून फर्मागुढी येथील प्रस्तावित कायमस्वरूपी 'आयआयटी गोवा' कॅम्पसला विरोध करू नये.
सर्वांचीच त्या देवतेवर श्रद्धा आहे. तसेच, या पवित्र देवस्थानाच्या परिसरातील किंवा आसपासच्या कोणत्याही जमिनीला स्पर्श केला जाणार नाही, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.