IFFI Film : ‘मी वसंतराव’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याशी साधलेला संवाद

IFFI Film : 'मी वसंतराव' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याशी साधलेला संवाद
IFFI Film : 'मी वसंतराव' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याशी साधलेला संवाद
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा : IFFI Film : लेखक, दिगदर्शक व अभिनेता निपुण धर्माधिकारी याचा चित्रपट 'मी वसंतराव' हा चित्रपट यावर्षी इंडियन पॅनारोमा विभागातून निवडण्यात आला आहे. 'सुवर्ण मयूर' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तो आहे. यासंदर्भात त्याच्याशी खास गप्पा मारल्या..

प्रश्न – इफ्फीमध्ये चित्रपटाची निवड झाली आहे. काय भावना आहेत?

उत्तर – लेखन, निर्मिती आणि प्रदर्शन अशा सर्वच प्रक्रियेत सिनेमाला ७-८ वर्षांचा काळ गेला आहे. मागच्या वर्षी सिनेमा प्रदर्शित होणार होता पण महामारीमुळे तो पुढे ढकलावा लागला. पण इफ्फी मध्ये त्याची निवड होणे हे आमच्यासाठी खूप आश्वासक आहे. आणि त्यातही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो आहे याचा प्रचंड आनंद आहे.

प्रश्न – सिनेमाचा लेखन आणि दिगदर्शनाचा प्रवास कसा होता? अनुभव कसा होता?

उत्तर – लेखनाच्या बाबतीत बोलायचं तर, यायाधी मी जे काही लेखन केले आहे त्यापेक्षा हा अनुभव खूप वेगळा होता. इतर लेखन बऱ्यापैकी उत्स्फूर्त असते. पण जेव्हा तुम्ही खऱ्या माणसाच्या आयुष्यावर लिहीत असता तेव्हा त्याला सत्याची जोड देणे खु आवश्यक असते. जी या लेखनामध्ये असणे खूप गरजेचे होते. त्यासाठी संशोधन आणि त्यातूनही ते पात्र नेमका विचार काय करते याचा विचार करणे खुप गरजेचे असते. त्यामुळे यामध्ये लेखक म्हणून योगदान खूप महत्वाचे होते. त्यातून वसंतराव यांचे पात्र, त्यांच्या आजूबाजूची पात्रे उभी करणे हा अनुभव खूप वेगळा होता. बऱ्याच संहिता लिहून एका संहितेवर आमचे एकमत झाले.

राहुलदादा सोबत मी नाटकांमध्ये काम केले आहे. मी दिगदर्शित केलेल्या नाटकामध्ये त्यांनी काम केले आहे. तो उत्तम काम करतो. सरावाने अभिनेता जी प्रगती करत असतो ते त्याच्यामध्ये खूप चांगले आहे. तो गाण्यासाठी जितका रियाज आणि मेहनत घेतो तेवढीच ती अभिनयावरही घेतो. त्यामुळे तो ही भूमिका उत्तम करेल हा माझा आत्मविश्वास होता. आणि अर्थात वसंतराव देशपांडे हे त्याचे आजोबा असल्याकारणाने त्याने पूर्ण ताकदीनिशी सेटवर येणे गरजेचे होते. ते त्याने केले आहे.

प्रश्न : वास्तव जीवनातील निपुण धर्माधिकारी कसा आहे?

उत्तर : कास्टिंग काऊच मध्ये मी जसा आहे तसाच मी वास्तव जीवनातही आहे. थोडा अधिक गंभीर आहे. इतका सतत टाईमपास करायला आवडत नाही. मी मित्रांसोबत जसा असतो तसा कास्टिंग काऊचवर असतो.

प्रश्न : वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे हाताळतानाचा अनुभव कसा आहे?

उत्तर: दिगदर्शक म्हणून जेव्हा माझी सुरुवात झाली तेव्हा माझे आदर्शच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करणारे होते. आणि मला नेहमी असे वाटायचे की हे किती लीलया विषय हाताळू शकतात. तितक्याच ताकदीने लोकांसमोर ते मांडू शकतात. मी फक्त माझ्या आदर्शाच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं पाऊल बरोबर पडते आहे असे अगदीच म्हणणे नाही, पण प्रयत्न तर सुरु आहेत.

प्रश्न: 'मी वसंतराव' पडद्यावर कधी येणार आहे? पुढचे प्रकल्प काय आहेत?

उत्तर : पुढच्या काही महिन्यात आम्ही सिनेमा प्रदर्शित करणार आहोत. एका नाटकावर, एका चित्रपटावर विशेषतः प्रायोगिक नाटकावर काम सुरु आहे.

प्रश्न: या क्षेत्रात धडपडणाऱ्या तरुणांना काय सांगशील?

उत्तर: शांत राहा, ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे ते कदाचित लवकर नाही मिळणार, तुम्ही प्रामाणिक पणे प्रयत्न करत राहा. नक्की एकदिवस तुमचे ध्येय साध्य होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news