

काव्या कोळस्कर
पणजी : जागतिक स्तरावर आपल्या पर्यटन क्षेत्रामुळे आणि परंपरेमुळे नावलौकिक कमावलेल्या गोव्याची इफ्फीचे स्थाई ठिकाण अशीही एक ओळख आहे. 2004 पासून पणजीत चित्रपट महोत्सवाचे आयोजन सुरू झाले. तेव्हाचा इफ्फीचा माहोल अगदीच वेगळा होता. बदलत्या काळानुसार आयोजनात अनेक अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले. मात्र या चित्रपट महोत्सवाने रसिकांना समृद्ध होण्याची संधी दिली, असे मत प्रयोगशील दिग्दर्शक मयूर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
इफ्फीचे गोव्यात आयोजन होणे हे माझ्यासारख्या कलाकारासाठी पर्वणीच होती. तेव्हा प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रत्यक्ष गोव्यात यावे लागत. आयोजकांकडून प्रतिनिधींना फॉर्म भरण्यासाठी दिला जात असे. फॉर्म भरून झाल्यानंतर आपली प्रतिनिधी नोंदणी झाल्याची खात्री करण्यासाठी पुन्हा दोन दिवसांनी बोलावले जात, असे मयूर यांनी सांगितले.
सुरुवातीला इतकी गर्दी दिसून येत नसे. केवळ सिनेमावर वेड्यासारखे प्रेम करणारे सिनेरसिकच या भागात दिसत. मला आठवते, मी इफ्फीमध्ये यायला सुरुवात केल्यापासून संपूर्ण महोत्सवात कमीत कमी 40 ते 50 सिनेमे पाहायचो. यामधील सर्वोत्कृष्ट 8 ते 10 सिनेमे निघाले, म्हणजे त्यावर्षीचा महोत्सव आणि चित्रपटांची निवड उत्तम, असे माझे मी गणित आखायचो. कदाचित इतरांचे गणित वेगळे असू शकते, असेही ते म्हणाले. सुरुवातीच्या काळात वर्ल्ड सिनेमाचे दिग्दर्शक येण्याचे प्रमाण अधिक होते. यामुळे उदयोन्मुख कलाकारांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येत असे. त्यांच्या शंका दूर होऊन ज्ञानात अधिक भर पडत असे. मात्र हळूहळू जागतिक दिग्दर्शकांचे महोत्सवामध्ये सहभाग घेण्याचे प्रमाण कमी होताना जाणवले.